नुकताच पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मनोरंजन विश्वातील कंगना राणौत ( Kangana Ranaut ), एकता कपूर, करण जोहर, अदनान सामी अशा अनेकांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं. यापैकी कंगनाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार विशेष चर्चेत आला. ‘पद्मश्री’ (Padma Shri) स्वीकारतानाचे कंगनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल तसे सोनू सूदचे चाहते संतापले होते. लॉकडाऊन काळात हजारो लोकांना मदत करूनही सोनूला पद्मश्री पुरस्कार न दिल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता यावर सोनू सूदची (Sonu Sood) प्रतिक्रिया आली आहे.
‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू यावर सूचक बोलला. कंगनाला पद्मश्री मिळाला. पण कोरोनाकाळात तू एवढं काम करूनही तुझ्या नावाचा या पुरस्कारासाठी का विचार झाला नाही? असा थेट प्रश्न सोनूला यावेळी करण्यात आला. यावर ‘हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे,’ असं सोनू हसत हसत म्हणाला.
निवडणूक लढणार का?सोनू सूद पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरू आहे. यावरही त्याने खुलासा केला. सोनूने ही निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.सोनू सूद याने पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला असला तरी त्याची बहीण मालविका सूद सच्चर या पंजाब निवडणूक लढवणार आहे. इंडियन एक्स्प्रेस च्या वृत्तानुसार, सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर ही येत्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहे. कोणत्या पक्षाच्या चिन्हावर ती निवडणूक लढणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
काही दिवसांपूर्वी मालविका आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मालविकासोबत सोनू सूददेखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोनू सूद हा काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नाही तर तो आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारही असू शकतो अशी चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली होती. मात्र, सोनू सूदने स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याविषयी कोणतंही भाष्य केलं नसलं तरीदेखील त्याची बहीण राजकारणात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे.