इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये 10 संघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. सतराव्या हंगामातील मुंबई इंडियन्सने दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण त्याचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याला दिलं जात आहे. पराभावानंतर हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यातच आता 'गरिबांचा मसिहा' म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये सोनू सूदने हार्दिक पांड्याचा उल्लेख केला नाही. पण, ही पोस्ट हार्दिक पांड्याच्या ट्रोलिंगशी संबंधित असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत.
सोनू सूदने खेळाडूंचा आदर करण्याचा सल्ला दिला आहे. या पोस्टमध्ये सोनू सूदने लिहिलंय. 'आपण आपल्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. ज्या खेळाडूंमुळे आपल्याला देशाचा अभिमान वाटतो, जे खेळाडू आपल्या देशाची मान उंचावतात. एक दिवस तुम्ही त्यांचा जयजयकार करता, तर दुसऱ्याच दिवशी तुम्ही त्यांना चिडवता. यामुळे ते नव्हे तर आपण अपयशी ठरतोय. मला क्रिकेट आवडतं. माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक क्रिकेटपटू मला आवडतो. पण तो खेळाडू तो कोणत्या फ्रँचाइजीसाठी खेळतोय, तो कर्णधार म्हणून खेळतोय, की तो संघातील 15 वा खेळाडू आहे, यानेही मला फरक पडत नाही. ते आपले हिरो आहेत', असं सोनू सूदने म्हटलं.
अभिनेता असण्यासोबतच सोनू सूद एक क्रिकेटर देखील आहे. तो सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील 'पंजाब दे शेर' संघाचा कर्णधार आहे. यंदा सीसीएलचा 10वा सीझन होता, ज्यामध्ये सोनूने पुन्हा एकदा आपल्या संघाचं नेतृत्व केलं. सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो लवकरच 'फतेह' चित्रपटात दिसणार आहे. 'फतेह' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनंदन गुप्ता यांनी केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. चित्रपटात ॲक्शनचा धमाका पाहायला मिळणार आहे.