अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय. सोनू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी सध्या यामुळे खऱ्या आयुष्यात तो नायक बनला आहे.
सोनू सूदने त्याच्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल केला आहे आणि त्याचमुळे त्याला मजुरांच्या व्यथा चांगल्याप्रकारे कळतात असे त्याच्या बहिणीने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तिने या मुलाखतीत सांगितले आहे की, आज आमचे आई-वडील या जगात नाही. पण आज ते असते तर सोनू काय करतोय हे पाहून त्यांना त्याच्याविषयी अभिमान वाटला असता. सोनू इंजिनिअरिंगचे शिक्षण नागपूरमध्ये घेत होता. त्यावेळेची एक गोष्ट मी आवर्जून सांगेन...
सोनूला ट्रेनने येण्यासाठी माझे वडील पैसे द्यायचे. पण तो ते पैसे वाचवायचा. कारण माझ्या वडिलांना हे पैसे कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागते याची त्याला कल्पना होती. तो ट्रेनमध्ये व्यवस्थितपणे बसून कधीच यायचा नाही. तो टॉयलेटच्या बाजूला असलेल्या छोट्याशा जागेत बसायचा. रात्रीदेखील तिथेच पेपर टाकून झोपायचा. त्याने आम्हाला ही गोष्ट कधीच सांगितली नव्हती. पण त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने आम्हाला सांगितले होते की, मी पहिल्यांदाच ट्रेनमध्ये व्यवस्थित बसून आलो. खूपच चांगलं वाटतंय... त्यावेळी सोनू अनेक वर्षं कशाप्रकारे प्रवास करायचा हे आम्हाला कळले होते. तो त्याच्या मॉडलिंगच्या दिवसात मुंबईत राहायचा. त्यावेळी देखील तो अतिशय छोट्याशा घरात राहायचा. तिथे झोपताना तुम्हाला कुशी बदलायला पण जागा नसायची. या सगळ्यामुळेच तो मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी इतके कष्ट घेत आहे. कारण त्याला त्यांचे दुःख चांगल्याप्रकारे माहीत आहे.