कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्यांप्रमाणे बॉलिवूड, मराठी आणि टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. वागळे की दुनिया या मालिकेच्या मुख्य कलाकारांसह 39 जणांना कोरोनाची लागण झाली असून चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. या मालिकेच्या सेटवर अशीच स्थिती राहिली तर ही मालिका बंद होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
वागळे की दुनिया या मालिकेतील मुख्य कलाकार सुमीत राघवन, परिवा प्रणती, भारती आचरेकर, बालकलाकार चिन्मयी साळवी आणि शीहान कपाही यांना कोरोनाची लागण झाली असून सेटवरील इतर कर्मचाऱ्यांना देखील कोरोना झालेला असे वृत्त अमर उजालाने दिली आहे.
कोरोनाची लागण झालेले सगळेच कलाकार आणि कर्मचारी त्यांच्या घरी राहून उपचार घेत आहेत. कोरोनाची ही स्थिती पाहाता मालिकेचे चित्रीकरण काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. कोरोनाच्या स्थितीबाबत अमर उजालाने मालिकेचे निर्माते जे.डी.मजेठिया यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप सगळ्यांचे कोरोना अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे याबाबत सध्या जास्त बोलता येणार नाही असे त्यांनी उत्तर दिले.
तर सब वाहिनीच्या प्रवक्त्यांशी अमर उजालाने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सेटवर काही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण याबाबत जास्त माहिती तुम्हाला मालिकेचे निर्मातेच देऊ शकतात.
वागळे की दुनिया या मालिकेत काम करणाऱ्या भारती आचरेकर आणि एका बालकलाकाराला पाच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या मालिकेच्या सेटवरील सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी अनेकजण संक्रमित असल्याचे लक्षात आले.
वागळे की दुनियाचे काही भाग चित्रीत केले गेले असल्याने काही दिवस प्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळणार आहे. पण त्यानंतर चित्रीकरण कधी सुरू होईल याबाबत अद्याप तरी काहीही माहिती मिळालेली नाही.