'कौन बनेगा करोडपती...' कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी सोनी वाहिनी, अमिताभ बच्चन, कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यावर सोशल मीडियाद्वारे लोकांनी टिप्पणी केली होती. यासाठी सोनी वाहिनी आणि अमिताभ यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. तसेच सोनी वाहिनी, अमिताभ बच्चन, कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माता यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पुण्यात केली होती. त्याकरता त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आला होता. अनेकांनी सोशल मीडियावर मोहीमही उभारली होती. पण आता या प्रकरणावर सोनी वाहिनीने माफी मागितली आहे.
नुकत्याच प्रसारित झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या भागात 'इनमे से कोन से शासक मुगल सम्राट औरंगजेब के समकालीन थे'...? या प्रश्नावर चार पर्याय देण्यात आले होते. त्यात ए ) महाराणा प्रताप बी ) राणा सांगा सी ) महाराजा रणजीत सिंह डी ) शिवाजी असे पर्याय देण्यात आले होते. त्यात महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर होता, यासाठी सोनी वाहिनी आणि अमिताभ बच्चन यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. सोशल मीडियावरील विरोध पाहता केबीसी मेकर्सनी त्यांच्या आगामी एपिसोडमध्ये याबद्दल माफीचा स्क्रोल चालवला आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या पेजवरून याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे की, 'बुधवारी केबीसीच्या एपिसोडमध्ये अनावधानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आमच्याकडून एक चूक झाली होती. त्याबद्दल आम्हाला खेद आहे. लोकांच्या भावनांचा विचार करून आम्ही खेद व्यक्त करत आमच्या आगामी एपिसोडमध्ये माफीचा स्क्रोल चालवला आहे.'
सोनी वाहिनीकडून याबाबत माफी मागण्यात आली असली तरी अमिताभ बच्चन यांनी अद्याप या प्रकरणावर मौन राखणेच पसंत केले आहे.