बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या (Jiah Khan) आत्महत्येनंतर अभिनेता सूरज पांचोली (Sooraj Pancholi) अडचणीत सापडला होता. जिया आणि सूरज यांचे प्रेमसंबंध होते. दरम्यान सूरजनेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असे आरोप त्याच्यावर लावले गेले. बऱ्याच वर्षांनी सूरजला कोर्टाने दिलासा मिळाला. आता सूरज फिल्मइंडस्ट्रीत करिअर बनवण्यास धडपड करत आहे. दरम्यान तो गेल्या सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली त्याने नुकतीच दिली. कोण आहे ती मुलगी?
सूरज पांचोलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जिया बरोबरच्या रिलेशनशिपवर मनमोकळेपणाने बातचीत केली. अनेक वर्षांपासून तो जिया खान आत्महत्याप्रकरणात लावलेल्या आरोपांचा सामना करत आहे. दरम्यान त्याने पहिल्यांदाच नवीन रिलेशनशिपचा खुलासा केला. तो म्हणाला, 'माझं आणि जियाचं रिलेशनशिप हे खूप कमी काळ होतं. आता मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो. गेल्या सात वर्षांपासून मी एका मुलीला डेट करत आहे. तिचा आणि सिनेइंडस्ट्रीचा काहीच संबंध नाही त्यामुळे मी तिची माहिती उघड करु शकत नाही.'
तो पुढे म्हणाला, 'माझं रिलेशनशिप हे सिक्रेट आहे. मी आधीच माझ्या वैयक्तिक गोष्टींवरुन खूप सहन केलंय. मला नेहमीच चुकीचं समजलं गेलंय. मला बेकार लव्हर, अनफेअर पार्टनर असंही म्हटलं गेलंय. पण आता मी ज्या रिलेशनशिपमध्ये आहे त्यात खूश आहे. आम्हाला दोघांनाही आताच काही उघड करायचं नाही.'
2013 मध्ये जिया खानने गळफास घेत आत्महत्या केली.त्यावेळी सुसाईड नोटही मिळाली. अभिनेत्रीच्या आईने सूरज पांचोलीवर गंभीर आरोप लावले. यानंतर सूरजला अटकही करण्यात आली. काही दिवसांनंतर त्याला जामीन मिळाला. मात्र हे प्रकरण सात वर्ष कोर्टात सुरु होतं. दरम्यान त्याला कामही मिळालं नाही. एप्रिल २०२३ मध्ये १० वर्षांनी कोर्टाने सूरजला सर्व आरोपांतून मुक्त केलं.