Join us

Costa Titch Death: २७ वर्षीय रॅपर गाता गाताच स्टेजवर कोसळला आणि जग सोडून गेला, शेवटचा VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 11:54 AM

Costa Titch Death: शनिवारी जोहान्सबर्ग याठिकाणी अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये कोस्टा परफॉर्म करत होता. त्याचवेळी तो स्टेजवर कोसळला आणि त्याचं निधन झालं...

Costa Titch Death: नुकतंच बॉलिवूड अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आता दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध कलाकार आणि रॅपर कोस्टा टिच याच्या निधनाची बातमी येतेय. कोस्टा टीच स्टेजवर परफॉर्म करत होता. याचदरम्यान अचानक कोस्टा खाली कोसळला आणि यानंतर त्याच्या निधनाचीच बातमी आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा त्याचा अखेरचा व्हिडीओ आहे. 

शनिवारी जोहान्सबर्ग याठिकाणी  अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये कोस्टा परफॉर्म करत होता. त्याचवेळी तो स्टेजवर कोसळला आणि त्याचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी कोस्टाने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाच्या बातमीने चाहते स्तब्ध आहेत. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या अस्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलला कोस्टाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. कोस्टाने या लाईव्ह शोमध्ये  एकापेक्षा एक दमदार गाणी गायली. मात्र कोस्टाचा हा अखेरचा परफॉर्मन्स असेल याची कोणी कल्पनासुद्धा केली नसेल.  

व्हिडीओमध्ये कोस्टा स्टेजवर गाताना, नाचताना दिसतोय. त्याच्यासमोरची गर्दी आनंदाने बेभान झाली आहे. याचदरम्यान कोस्टा अचानक  स्टेजवर पडतो. मात्र त्याच्या जवळच उभा असलेला व्यक्ती त्याला उचलतो. कोस्टाचा पाय अडखळला असावा आणि त्यामुळेच तो पडला असावा असं वाटत असतानाच तो, क्षणभरात आणखी एकदा कोसळतो. पण यावेळी तो उठू शकत नाही. स्टेजवर धावपळ सुरू होते. या घटनेनंतर कोस्टाला यानंतर ताबडतोब रूग्णालयात हलवण्यात आलं. पण काही क्षणानंतर त्याच्या निधनाचीच बातमी आली. दक्षिण आफ्रिकेतील सेलिब्रिटी फिल एमफेलाने शनिवारी रात्री ट्विट करत कोस्टाच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

कोस्टा टिचचा जन्म नेल्स्प्रूटमध्ये झाला होता. त्यांच पूर्ण नाव Costa Tsobanoglou आहे. 27 वर्षीय कोस्टाला डान्सची आवड होती. सुरुवातीला छंद म्हणून त्याने डान्सचा मार्ग निवडला. मात्र वयाच्या 15 व्या वर्षी मित्र बेनी चिलसोबत त्याने डान्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी 2014 मध्ये तो जोहान्सबर्गला आला. तिथे तो ‘न्यू एज स्टीझ’ या डान्स ग्रुपमध्ये तुमी त्लादी आणि फँटम स्टीझ यांच्यासोबत सहभागी झाला. कोस्टाने विविध आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. डान्ससोबतच त्याने रॅपिंगवरही भर दिला. रॅपसाठी त्याने स्वत:ची अशी वेगळी स्टाइल निर्माण केली होती.

टॅग्स :सेलिब्रिटीहॉलिवूडद. आफ्रिका