गेल्या काही काळात साऊथ सिनेमा आणि साऊथ स्टार यांची प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रियता वाढली आहे. खासकरुन साऊथ स्टारचं नम्रपणे वागणं नेटकऱ्यांना भावत आहे. सोशल मीडियावर साऊथ स्टारचे वरचेवर व्हिडीओ व्हायरल होत असतात, या व्हिडीओमध्ये ते चाहत्यांशी कसं आदराने वागतात हे दिसून येतं. मात्र, प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला (varinder chawla) याने मात्र साऊथ इंडस्ट्रीविषयी एक गौप्यस्फोट केला आहे.
अलिकडेच वरिंदर चावला यांनी 'हिंदी रश'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने साऊथ इंडस्ट्री आणि त्यातील कलाकारांविषयी भाष्य केलं. साऊथचे स्टार कॅमेरासमोर जितके नम्र दिसतात तितके प्रत्यक्षात नाहीत, असं त्याने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. सोबत ज्युनिअर एनटीआर (jr. NTR) , महेश बाबू, विजय देवरकोंडा याच्याविषयी सुद्धा भाष्य केलं.ढोंग आहे त्यांचं, दिखाव्यासाठी सगळं करतात
वरिंदर चावला याला या मुलाखतीमध्ये साऊथ स्टारच्या सोशल मीडिया इमेजविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने विजय देवरकोंडापासून (vijay deverakonda) ज्युनिअर एनटीआरपर्यंत साऊथ स्टार यांचा खरा स्वभाव कसा आहे हे सांगितलं.
"प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ते लोक ढोंग करतात. ते फक्त कॅमेरासाठी सगळं करतात. एक अभिनेता होता जो सिनेमाच्या प्रमोशनसाठी चप्पल घालून कॅमेरासमोर नम्र असल्याचं दाखवत होता", असं वरिंदर म्हणाला. त्याच्या या वक्तव्यावर तो विजय देवरकोंडाविषयी बोलतोय का असं विचारलं. त्यावर त्याने 'हो' असं उत्तर दिलं.
कॅमेरासमोर फक्त नम्र, प्रत्यक्षात सगळं उलटंच
"अलिकडेच माझ्या टीमने साऊथच्या एका मोठ्या स्टारसोबत व्हिडीओ शूट केलं. हा अभिनेता एरवी तर शांत असल्याचं दिसतं. मात्र, आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जात होतो त्याचवेळी त्याने माझ्या टीमच्या एका व्यक्तीला वाईट पद्धतीने फटकारलं. इतकंच नाही तर त्याने त्याला जोरात फटका मारला. पण, मी हा व्हिडीओ शेअर नाही केला. पण, एका दुसऱ्या फोटोग्राफरने मात्र तो शेअर केला." यावेळी सुद्धा वरिंदरने या अभिनेत्याचं नाव घेतलं नाही. परंतु, मध्यंतरी ज्युनिअर एनटीआरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
महेश बाबू सुद्धा ढोंगीच
महेश बाबूने (mahesh babu) एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडवर टीका केली होती. या गोष्टीचा संदर्भ देत वरिंदरने त्याच्या स्वभावाविषयी भाष्य केलं. मेजर सिनेमाचा एक कार्यक्रम होता त्यात महेश बाबू सहभागी झाला होता आणि तो सगळ्यांसमोर, आम्हाला बॉलिवूडची गरज नाही, असं सांगत होता. त्यांचं वागणं आणि बोलण्याची पद्धत पाहून माझं असं झालं होतं की, 'ही कोणती पद्धत आहे बोलण्याची? मला वाटतं हे सगळं ढोंगीपण आहे. हे स्वत:ची तुलना बॉलिवूडसोबत करतायेत. पण, बॉलिवूडचे कलाकार यांच्यासारखं ढोंग तर करत नाहीत ना. जर बॉलिवूडचा एखादा कलाकार नाराज झाला तर तो जाहीरपणे सार्वजनिकरित्या त्यांची नाराजी व्यक्त करतो.'