- राज चिंचणकरकेवळ मनोरंजनासाठी काही चित्रपट बनवले जातात; परंतु तसे करताना त्यात काटेकोर गांभीर्य सांभाळावे लागते, याची जाणीव प्रत्येकवेळी ठेवली जातेच असे नाही. मग डोके बाजूला ठेवून अशा चित्रपटांकडे पाहावे, अशी एक पळवाट काढली जाते. ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाबाबतही अगदी तेच करावे लागते. पूर्णत: दाक्षिणात्य मसाला पेरत मराठीत अवतरलेला हा चित्रपट म्हणजे करमणुकीसाठी जमवलेला गोतावळा आहे.राजा हा चाळीत राहणारा बेकार तरुण आहे आणि पैसे मिळवण्यासाठी तो याची टोपी त्याला आणि त्याची याला, या धर्तीवर घाम गाळत असतो. एकदा त्याच्या गळाला बडा मासा लागतो आणि राजाच्या डोळ्यांसमोर मोठी स्वप्ने नाचू लागतात. मध्यंतरीच्या काळात त्याचा दोस्त बनलेल्या अवलिया अशा छोट्या गुड्डूला हाती धरून तो त्याचा बेत तडीस नेतो. एक राजकारणी आणि एक उद्योगपती यांना ब्लॅकमेल करून हे दोघे (त्यांच्या दृष्टीने) भन्नाट अशी कामगिरी फत्ते करतात.कथा, पटकथालेखक व दिग्दर्शक गिरिधरन स्वामी यांनी दोन घटका करमणूक या तत्त्वावर हा चित्रपट रचला आहे; परंतु त्याला मिळालेला दाक्षिणात्य तडका काही ते पुसू शकलेले नाहीत. परिणामी, मराठीत अशी गोष्ट मांडताना त्यांचा होरा चुकलेला दिसतो. अचाट (आणि काहीबाहीसुद्धा) अशा प्रकाराचे परिणाम मराठीजनांवर होत नाहीत, याचा विचार त्यांचा बहुधा करायचा राहून गेलेला असावा. निव्वळ मनोरंजन म्हणून दाक्षिणात्य बाजाची गोष्ट सादर केली की झाले, असा भ्रमाचा भोपळा यात निर्माण झालेला दिसतो.गौरव घाटणेकर (राजा) व बालकलाकार निहार गीते (गुड्डू) यांची यातली कामगिरी ठीक आहे. मात्र यातल्या ‘बाळ’ गुड्डूच्या तोंडी वैचारिक संवाद घालून त्याला उगाचच ‘मोठे’ केले आहे. निखिल रत्नपारखी याने मात्र त्याच्या हुकमी अभिनयाच्या बळावर चित्रपटात धमाल रंगत आणत चित्रपटाला तारण्याचे काम केले आहे. सुप्रिया पाठारे, नागेश भोसले, अक्षर कोठारी, भाग्यश्री मोटे, ऐश्वर्या सोनार, श्रीकांत मस्की आदी कलाकारांनी निव्वळ दिग्दर्शकाच्या सांगण्याबरहुकूम भूमिका रंगवल्या आहेत. बाकी नेहमीचेच; डोके बाजूला काढून या चित्रपटाचा आस्वाद घेतल्यास काही वेळ मनोरंजनाची गॅरंटी हा चित्रपट देऊ शकतो.
दाक्षिणात्य मसाल्याचा गोतावळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2017 2:28 AM