मल्याळम आणि तमीळ चित्रपटांतील सुपरस्टार ममूटी यांचा आज वाढदिवस असून त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९५१ ला कोची येथे झाला होता. ममूटी हे नाव त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी ठेवले. त्यांचे खरे नाव मुहम्मद कुट्टी पनिपरमबिल इस्माइल असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ममूटी यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले असून त्यांना अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. आजवर त्यांना त्यांच्या अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. ममूटी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा दलकर सलमान गेल्या काही वर्षांपासून अभिनयक्षेत्रात आपले भाग्य आजमावत आहे. त्याच्या वडिलांप्रमाणेच तो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव असून त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
ममूटी यांनी सत्तरीच्या दशकापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आजवर ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. थीरम तेंदुन्ना थीरा, रुग्मा, कोट्टायम कुंजाचान, कनलकट्टू, सागरम साक्षी, मिशन ९० डेज असे त्यांचे आजवर अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. हा दाक्षिणात्य अभिनेता हा खूप श्रीमंत असल्याचे फिनॅप या बेवसाईटने म्हटले आहे. या वेबसाईटनुसार ममूटी यांच्याकडे जवळपास २०० कोटीहून अधिक पैसे आहेत. ममुटी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार असल्याने ते एका चित्रपटासाठी जवळजवळ तीन ते साडे तीन कोटी घेतात. ममूटी आपल्या कुटुंबियांसमवेत कोच्ची येथील जोसेफ रोड या परिसरात राहातात. त्यांचे येथील घर भलेमोठे असून हे घर त्यांनी करोडोमध्ये खरेदी केले होते.
ममुटी यांना गाड्यांचे तर प्रचंड वेड आहे. ममूटी यांच्याकडे किती गाड्या आहे हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. त्यांच्याकडे जवळजवळ ३६९ गाड्या आहेत. कार ठेवण्यासाठी घराच्या परिसरात एक भलेमोठे गॅरेज असून त्यांच्या एकदंरीत सगळ्या गाड्यांची किंमत ही १०० कोटीहून देखील अधिक आहे. त्यांना स्वतः कार ड्राईव्ह करायला आवडते.