फिल्मी दुनियेत स्वत:चे स्थान टिकवून ठेवणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. आता दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाचेच बघा. होय, कधीकाळी साऊथ इंडस्ट्रीची आघाडीची नायिका असलेल्या तमन्नाकडे आता निर्माता-दिग्दर्शकांनी पाठ फिरवली आहे. अनेक हिट सिनेमे देऊनही आज तिच्याकडे काम नाही.होय, चर्चा खरी मानाल तर अलीकडे तमन्नाला चित्रपट नाही तर केवळ आयटम सॉन्ग ऑफर होतात. जॅगुआर हा कन्नड सिनेमा, यशचा ‘केजीएफ- चाप्टर 1’, महेशबाबूचा ‘सरिलेरू नीकिवारू’ या अलीकडे प्रदर्शित झालेल्या सिनेमात तमन्ना स्पेशल सॉन्ग करताना दिसली. तिचे एफ 2 -फन अॅण्ड फ्रस्टेशन आणि देवी असे एक-दोन सिनेमे यंदा प्रदर्शित झालेत. पण तरिही गेल्या दोन वर्षांत तिच्याकडे येणा-या ऑफर्सची संख्या घटली आहे.
तमन्नाने आत्तापर्यंत विविध भाषेतील सुमारे 60 सिनेमांत काम केले. पण याऊपरही सध्या तिच्याकडे चांगल्या भूमिका नाहीत. अफवा ख-या मानाल तर, तमन्नाला सोडून निर्माता-दिग्दर्शकांनी नव्या हिरोईन्सच्या नावाला पसंती दिली आहे. अशात केवळ आयटम सॉन्गच्या भरवशावर तमन्नाचे फिल्मी करिअर किती काळ टिकणार, हा प्रश्न आहे.
लवकरच तमन्ना ‘क्वीन’ या बॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. ‘दॅट इज महालक्ष्मी’ असे या रिमेकचे नामकरण करण्यात आले आहे. पण अद्यापही या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. ‘बोले चूडिया’ या हिंदी सिनेमातही ती झळकणार आहे. एकंदर काय तर आता याच चित्रपटांचा काय तो तमन्नाला आधार आहे. हे सिनेमे तमन्नाच्या करिअरला कशी गती देतात, ते बघूच.