अभिनेत्री तृषा कृष्णनबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेता मंसूर अली खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृषा कृष्णनवर असभ्य टिप्पणी केल्यामुळे मंसूर अली खानवर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
मन्सूर अली खानवर तामिळनाडूतील नुंगमबक्कममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 354 ए आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) घेतली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रकरण इतकं तापलेलं असतानाही मंसूर अली खान याने त्याची चूक अद्यापही कबूल केलेली नाही. इतकंच नाही तर त्याने काही झालं तरी तृषाची माफी मागणार नाही असं थेट सांगितलं आहे.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या थलापती विजयच्या 'लिओ' सिनेमात मंसूर अली खान आणि तृषाही झळकले आहेत. यामध्ये तृषाबरोबर एक सीन करण्याबाबत मंसूरने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. "जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचाय त्यावेळी मी मला वाटलं की हा एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन'.
पुढे तो म्हणाला, 'जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी यापूर्वीही अनेक बलात्काराचे सीन शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. परंतु, काश्मीरमध्ये शूटिंग सुरु असताना मला तृषाला पाहायला सुद्धा दिलं नाही', असं मंसूर अली खान म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर तृष्षाने संताप व्यक्त केला होता. मंसूर अली खान याचं व्यक्तव्य ऐकल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर, लियोचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांकडून त्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे.