Join us

अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींना जामीन, CM रेवंत रेड्डींसोबतचं कनेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:46 IST

Attacked On Allu Arjun's house: अल्लू अर्जुन याच्या हैदबादमधील घरावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटनाही घडली होती. आता या हल्ल्यातील सहा आरोपींना हैदराबादमधील स्थानिक कोर्टाने जामीन दिला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा सध्या मोठ्या वादात सापडलेला आहे. पुष्पा-२ सिनेमाच्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यापासून तेलंगाणामधील सरकार आणि पोलिसांनी अल्लू अर्जुनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, अल्लू अर्जुन याच्या हैदबादमधील घरावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटनाही घडली होती. आता या हल्ल्यातील सहा आरोपींना हैदराबादमधील स्थानिक कोर्टाने जामीन दिला आहे. यादरम्यान, अल्लू अर्जुन याच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींमधील एक आरोपी रेड्डी श्रीनिवास हा तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा बीआरएसच्या नेत्याने केला आहे. 

अल्लू अर्जुन याचं हैदराबादमधील ज्युबिली हिल्स परिसरात घर आहे. रविवारी संध्याकाळी उस्मानिया विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांना अल्लू अर्जुन याच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी ६ आंदोलकांना अटक करण्यात आली होती. आरोपींना हैदराबादच्या स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा कोर्टाने त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा बॉण्ड आणि दोन जामीन हजर करण्यास सांगितले. अल्लू अर्जुन याने मृत महिलेच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

यादरम्यान, बीआरएस नेते कृषांक यांनी आरोप केला की, सहा आरोपींमधील एका आरोपीचं नाव श्रीनिवास रेड्डी आहे. तो मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा निकटवर्तीय आहे. तसेच २०१९ च्या जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघातून त्याने काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. कृषांक यांनी आरोपीचे रेवंत रेड्डींसोबतचे फोटोही एक्सवर शेअर केले आहेत.

४ डिसेंबर रोजी पुष्पा २: द रूल या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान हैदराबादमधील संध्या थिएटर येथे चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी अल्लू अर्जुन स्वत:ही तिथे आला होता. अल्लू अर्जुनला पाहिल्यानंतर उपस्थित चाहते नियंत्रणाबाहेर गेले आणि चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचा दावा अल्लू अर्जुनकडून करण्यात येत आहे. मात्र तेलंगाणा सरकार आणि पोलीस या घटनेचं खापर अल्लू अर्जुनवर फोडत आहे. तसेच अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती. मात्र त्याला उच्च न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता.  

टॅग्स :अल्लू अर्जुनतेलंगणाकाँग्रेसभारत राष्ट्र समिती