Actress and BJP leader Namitha : भारतात असलेल्या हजारो मंदिरांमध्ये कोट्यवधी भाविक दर्शनासाठी जात असतात. भारताच्या संविधानाने सर्वांना समानतेचा हक्क दिला आहे. समानतेच्या न्यायाने सर्वांना मंदिरात प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. देवता ही कोणत्याही भाविकांमध्ये भेदभाव करत नाही. प्रत्येक श्रद्धाळू देवासमोर समान असतो. मात्र, तामिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मदुराईतील मीनाक्षी सुंदरेश्वरी या मंदिरात दर्शनाला गेलेल्या तमिळ अभिनेत्री आणि भाजपा नेत्या नमिता यांना हिंदू असल्याचा पुरावा मंदिर प्रशासनाने मागितला.
नमिता यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. मंदिर प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले आणि हिंदू असल्याचा पुरावा मागितल्याचा आरोप नमिता यांनी केला. तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलेल्या नमिता यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, "पहिल्यांदाच मला माझ्या देशात आणि माझ्याच राज्यात परके असल्याची भावना दिसून आली. मी हिंदू आहे, याचा मला पुरावा द्यावा लागला. मला पुरावा मागितला याचे वाईट वाटले नाही, पण ज्या पद्धतीने मागण्यात आला, त्याचं अधिक वाईट वाटले. मंदिर प्रशासनाचे अधिकारी आणि त्यांचे सहकारी हे आमच्याशी अतिशय उद्धट पद्धतीने वागले".
नमिता यांनी गैरवर्तन करणाऱ्या मंदिर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी तामिळनाडू सरकारकडे केली आहे. दरम्यान, मंदिर प्रशासनातील अधिकऱ्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, 'नमिता आणि त्यांचे पती हे मास्क परिधान करून मंदिरात प्रवेश करत होते. त्यामुळे ते हिंदू आहेत का? याची चौकशी करण्यात आली. तसेच त्यांना मंदिरातील परंपरांची माहिती देण्यात आली. हिंदू असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या कपाळी टिळा लावून मंदिरात प्रवेश देण्यात आला'.