मल्याळम अभिनेता आणि दिग्दर्शक जॉय मॅथ्यू यांच्या गाडीचा अपघात झालंय. या अपघातात ते जखमी झालेत. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री त्यांच्या कारला अपघात झाला. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली आणि अभिनेत्याच्या तब्येतीचीही माहिती दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंडलमकुन्नू येथील चावक्कड-पोन्नानी महामार्गावर जॉय मॅथ्यू यांच्या कारची पिकअप व्हॅनला धडक लागल्याने हा अपघात झाला. या धडकेत मॅथ्यू आणि व्हॅनचा चालक किरकोळ जखमी झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, "मॅथ्यू यांचा ड्रायव्हर कार चालवत होता. मॅथ्यू यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली आहे, तर व्हॅन चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र सर्वजण सुखरूप आहेत.
जॉय मॅथ्यू यांची हेल्थ अपडेट देताना पोलिस अधिकारी म्हणाले, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या अपघातानंतर व्हॅनचा मालक अडकला होता त्याला अभग्निशमन विभागाने बाहेर काढले.
जॉय मॅथ्यू यांच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर त्यांनी १९८६ साली आलेल्या अम्मा अरियान सिनेमातून करिअरची सुरुवात केली. यानंतर २०१२मध्ये त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. शटर नावाच्या सिनेमाचे दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. जॉय मॅथ्यू यांना आतापर्यंत अनेक अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आले आहे.