"देशात जेसीबी बघायला पण गर्दी होते", 'पुष्पा २'वरुन अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला- "अल्लू अर्जुन..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 04:21 PM2024-12-10T16:21:35+5:302024-12-10T16:22:24+5:30
'पुष्पा २'च्या ट्रेलर लॉन्चला जमलेल्या अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची तुलना त्याने जेसीबी बघायला जमलेल्या लोकांसोबत केली आहे.
Pushpa 2: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा'चा सीक्वल असलेल्या 'पुष्पा २'साठी प्रेक्षकांना तब्बल ३ वर्ष वाट पाहावी लागली. 'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ला देखील प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच सिनेमाचे शोज हाऊसफूल झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच अल्लू अर्जुनच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. पण, 'पुष्पा २'च्या सक्सेसवर अभिनेता सिद्धार्थने खोचक टिप्पणी केली आहे.
सिद्धार्थने एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये बोलताना त्याने अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या सक्सेसवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. 'पुष्पा २'च्या ट्रेलर लॉन्चला जमलेल्या अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची तुलना त्याने जेसीबी बघायला जमलेल्या लोकांसोबत केली आहे. "आपल्या देशात जेसीबी बघायलादेखील लोक गर्दी करतात. त्यामुळे बिहारमध्ये अल्लू अर्जुनला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली तर ती कोणतीही मोठी गोष्ट नाही. आयोजन केलं तर गर्दी होणारच आहे. पण, भारतात गर्दी झाली म्हणजे क्वालिटी काम आहे असं नाही. असं असेल तर सगळ्या राजकीय पक्षांनी निवडणुकीत जिंकायला हवं होतं. पण, ही गर्दी केवळ बिर्याणी आणि दारुच्या बाटल्यांसाठी होते", असं सिद्धार्थ म्हणाला.
दरम्यान, 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 'पुष्पा २' प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने १६४.२५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटींची कमाई केली. शनिवारी 'पुष्पा २'ने ११९.२५ कोटी कमावले. तर रविवारी १४१.५ कोटींचा गल्ला जमवला. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' सिनेमाने पहिल्या सोमवारी ६४.१ कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५९३.१ कोटींचा गल्ला जमवला आहे.