'बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचरल आहे. प्रभास ह्याची क्रेझ तर सर्वांनाच माहित आहे. त्याचे चित्रपट असो किंवा त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असतेच. तो कायमच त्याच्या लव्ह लाईफमूळे चर्चेत असतो. चाहते प्रभासच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असून त्याच्या लग्नाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
प्रभासची मावशी श्यामला देवी यांनी त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. एका मुलाखतीमध्ये श्यामला देवी म्हणाल्या, 'आम्हाला दुर्गामाचा आशीर्वाद आहे. देव आपल्या सर्वांची चांगली काळजी घतोय. प्रभासचं लग्न होणार आहे आणि तेही लवकरच होणार आहे. आम्ही तुम्हा सर्वांना (माध्यमांना) लग्नासाठी आमंत्रित करू'. त्यांच्या या प्रतिक्रियेवरुन प्रभास लवकरच लग्नबधंनात अडकणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
शिवाय, प्रभासने त्याच्या लग्नाचे लोकेशन आधीच ठरवलं आहे. आदिपुरुषच्या प्रमोशनदरम्यान प्रभासने तिरुपतीमध्ये लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. ही घोषणा ऐकून चाहते खूप खूश झाले होते. मात्र, प्रभासने त्याच्या उत्तरात तो कधी लग्न करणार आहे हे सांगितले नव्हते.
अलीकडेच प्रभासच्या रिलेशनशिपविषयी चर्चांना उधाण आलं होतं. 'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रभास आणि क्रिती सेनॉनची केमिस्ट्री पाहून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचं चाहत्यांना वाटलं होतं. मात्र क्रिती किंवा प्रभास यांच्यापैकी कुणीही स्पष्टपणे नात्याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नात्याविषयी ठोस अशी माहिती समोर आली नाही. शिवाय, याआधी प्रभासचं नाव 'बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीसोबतही जोडलं गेलं होतं.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर प्रभासचा 'सालार' 22 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, 'स्पिरिट' आणि 'प्रोजेक्ट के' सारख्या चित्रपटांमध्येही प्रभास दिसणार आहे.