समांथा रुथ प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर ३ वर्षांतच नागा चैतन्य पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. साऊथ स्टार नागा चैतन्यने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. ८ ऑगस्टला नागा चैतन्य आणि शोभिताने साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता साखरपुड्यानंतर त्यांची लगीनघाई सुरू आहे. नागा चैतन्य आणि शोभिता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. त्या दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केल्यानंतर आता २०२५ च्या मार्च महिन्यात नागा चैतन्य आणि शोभिता लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे एक डेस्टिनेशन वेडिंग असून यासाठी त्यांचे कुटुंबीय वेन्यू शोधण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. रिपब्लिक वर्ल्डने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, मध्य प्रदेशात नागा चैतन्य आणि शोभिताच्या वेडिंग वेन्यूसाठी काही ठिकाणं पाहिली जात आहेत. त्याबरोबरच विदेशात त्यांचा शाही विवाहसोहळा होणार असल्याचंही बोललं जात आहे.
नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ साली लग्न करत संसार थाटला होता. त्यांच्याकडे साऊथमधील आदर्श कपल म्हणून पाहिलं जायचं. पण, काही कारणांमुळे २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करत होता. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. पण, त्या दोघांनीही याबाबत मौन बाळगणं पसंत केलं होतं. काही वर्ष डेट केल्यानंतर आता नागा चैतन्य आणि शोभिताने लग्न करत एकमेकांबरोबर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.