Join us  

"सिनेमात रोल देण्यासाठी घरी बोलावलं अन्..."; अभिनेत्रीचा आरोप, डायरेक्टरवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 5:49 PM

हेमा कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर मॉलीवूडमधील महिला उघडपणे त्यांच्यावरील अत्याचार पुढे आणत आहेत. त्यातच आता बंगाली अभिनेत्रीने प्रसिद्ध डायरेक्टर रंजीत यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये लैंगिक शोषणाच्या आरोपानं वाद निर्माण झाला आहे. यातच आता बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्राने प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रंजीत यांच्याविरोधात लैंगिक शोषण आणि शारिरीक छळाची तक्रार दिली आहे. सोमवारी याबाबत अभिनेत्री दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. त्यात रंजीत यांनी २००९ मध्ये चित्रपटात भूमिका देताना घरी बोलावलं आणि त्यावेळी माझा लैंगिक छळ केला असा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

कोची सिटी पोलीस स्टेशनला डायरेक्टर रंजीतविरोधात गुन्हा दाखल करताना अभिनेत्री श्रीलेखा मित्राने म्हटलंय की, २००९ मध्ये मला फिल्म पालेरिमानिक्कम यात भूमिका देण्यासाठी मला कोचीला बोलावण्यात आलं. तिथे रंजीत डायरेक्टर होते. चित्रपटातील माझ्या भूमिकेबाबत चर्चा करण्यासाठी रंजीत यांनी त्यांच्या कालूर कदावंथरा येथील फ्लॅटवर बोलावलं होते जिथे ते थांबले होते. फ्लॅटमध्ये सिनेमावर चर्चा करताना रंजीत यांनी माझा हात पकडला आणि त्यानंतर संबंध बनवण्याच्या हेतून शरीरावर हात फिरवू लागले असं तिने सांगितले. 

त्यानंतर पुढचा धोका टाळण्यासाठी मी फ्लॅटमधून पळून माझ्या हॉटेलवर आले जिथं मी थांबली होती. दुसऱ्या दिवशी या घटनेबाबत सिनेमाचे स्क्रिप्ट रायटर श्री जोशी जोसेफ यांना सांगितले. मला घरी जाण्यासाठी तिकीट दिले नव्हते त्यामुळे मी श्री जोशी यांच्याकडे मदत मागितली होती. मी कोलकाता येथे राहते, त्यामुळे दक्षिणेकडील स्थानिक कायदेशीर प्रक्रिया मी समजू शकत नव्हते. त्यामुळे मी तक्रार केली नव्हती असं अभिनेत्रीनं म्हटलं. आता ईमेलद्वारे अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, आम्हाला डायरेक्टर रंजीत यांच्याविरोधात तक्रार प्राप्त झाली. नॉर्थ पोलीस स्टेशनमध्ये कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारद्वारे बनवलेल्या एसआयटी टीमकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे असं पोलीस आयुक्त ए श्यामसुंदर यांनी सांगितले. सोमवारी तक्रार दाखल होण्यापूर्वीच डायरेक्टर रंजीत यांनी केरळ राज्य चलचित्र अॅकेडमीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. अलीकडेच मल्याळम अभिनेत्री सोनिया मल्हार हिने २०१३ साली फिल्म शुटींगवेळी एका अभिनेत्याकडून तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली असा आरोप केला आहे. 

काय आहे हेमा कमिटी?

गेल्या अनेक वर्षांपासून प्रादेशिक चित्रपटसृष्टीशी संबंधित अशा अनेक घटना समोर येत आहेत, ज्यामध्ये महिला कलाकारांना चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात अनेक बड्या चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याकडून आक्षेपार्ह मागणी केल्याचे उघड झालं आहे. शूटिंगदरम्यान त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे काही महिला कलाकारांनी सांगितले आहे. या वाढत्या केसेस पाहता २०१९ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती हेमा यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती, जी अशा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवत होती. समितीच्या स्थापनेनंतर सुमारे ४ वर्षांनी १९ ऑगस्टला हेमा समितीने केरळ सरकारला २३३ पानांचा अहवाल सादर केला. ज्यामध्ये अनेक बड्या कलाकारांकडून होणारे शोषण समोर आले. रिपोर्ट्स येताच अनेक अभिनेत्री आपल्यासोबत झालेल्या शोषणाचा खुलासा करत आहेत. 

टॅग्स :गुन्हेगारी