मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांनी दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच लोकांचे मन जिंकून घेतले. लोकांमध्ये त्यांची इतकी क्रेझ आहे की, त्यांच्या चित्रपटांची तिकीटे मिळवण्यासाठी अक्षरशः लोकांमध्ये हाणामाऱ्याही झालेल्या. त्यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने गोरवण्यात आलेले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कारदेखील दिलेला आहे. आता त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. त्यांच्या नावाची आता गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
मेगास्टार चिरंजीवींच्या नावाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. 45 वर्षांच्या कारकिर्दीत 156 चित्रपटांतील 537 गाण्यांमध्ये 24 हजार डान्स स्टेप्स केल्याबद्दल त्यांना हा मान मिळाला. हैद्राबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात अभिनेता आमिर खानने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. एवढंच नाही तर पुरस्कार दिल्यानंतर आमिर खानने आनंदात चिरंजीवीला मिठीही मारली.
चिरंजीवी यांच्यासाठी आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी त्यांनी 1978 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. चिरंजीवी यांनी 'पुनाधिरल्लू' या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. पण, 'मन वुरी पांडावुलु' हा त्यांचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट होता. 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'इंतलो रामय्या वीधिलो कृष्णय्या' सारख्या हिट चित्रपटातून त्यांनी मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली. 'कैदी' या चित्रपटाने चिरंजीवी यांना रातोरात मोठा सुपरस्टार बनवले आणि त्यांना मेगास्टार चिरंजीवीचा टॅग मिळाला.
चिरंजीवी यांचे खरे नाव कोनिडेला शिव शंकर वरप्रसाद राव. मात्र, मनोरंजन विश्वात पदार्पण केल्यानंतर त्यांना चिरंजीवी याच नावाने ओळखले गेले. चिरंजीवी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते शेवटचे 2023 च्या भोला शंकर मध्ये दिसले होते. त्यांचा आगामी सिनेमा विश्वंभरा हा 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.तब्बल 150हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे चिरंजीवी 1650 कोटींचे मालक आहेत.