Join us

दाक्षिणात्य अभिनेत्याचे सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप; केंद्र सरकारने घेतली दखल, कडक कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 5:52 PM

सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱ्यांनी चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यासाठी ६.५ लाख रुपयांची लाच घेतलाच्या गंभीर आरोप विशालने केला होता. याबाबत त्याने एक ट्वीटही केलं होतं. त्याच्या या ट्वीटची केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. 

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. सेन्सॉर बोर्डातील (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन)अधिकाऱ्यांनी चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यासाठी ६.५ लाख रुपयांची लाच घेतलाच्या गंभीर आरोप विशालने केला होता. याबाबत त्याने एक ट्वीटही केलं होतं. या ट्वीटमध्ये 'मार्क एंटनी' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सर्टिफिकेट देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने पैसे उकळल्याचं त्याने म्हटलं होतं. त्याच्या या ट्वीटची केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. 

विशालचे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर मोदी सरकार एक्शन मोडमध्ये आलं आहे. या प्रकरणाबाबत चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असं माहिती आणि प्रसारण विभागाकडून म्हटलं गेलं आहे. या संदर्भात एक ट्वीटही करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये "अभिनेता विशालने सीबीएसी संदर्भात समोर आणली भ्रष्टाचाराची बाब अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. भ्रष्टाचारासारख्या गोष्टी सरकार सहन करणार नाही आणि यात दोषी असलेल्यांविरोधात कारवाई केली जाईल. माहिती आणि प्रसारण विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी आजच मुंबईला येऊन या प्रकरणाची चौकशी सुरू करतील. सीबीएफसी संदर्भात तुम्हाला जर असे अनुभव आले असतील तर आम्हाला संपर्क करा", असं म्हटलं आहे. 

विशालने ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं होतं? 

"मोठ्या पडद्यावर भ्रष्टाचारासारखा मुद्दा उचलणं ठीक आहे. पण, खऱ्या आयुष्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच भ्रष्टाचार करणं चुकीचं आहे. पण, सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये हेच होत आहे. मलादेखील मार्क एंटनी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ६.५ लाख रुपये द्यावे लागले. आम्ही चित्रपटाला सर्टिफिकेट मिळण्यासाठी सेन्सॉर बोर्डात अर्ज केला होता. पण, शेवटच्या क्षणी त्याला सर्टिफिकेट नाकारण्यात आलं. या चित्रपटासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ६.५ लाख रुपये मागितले. दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे मी त्यांना पैसे दिले. पैसे बँक ट्रान्सफर करायचे असं मी मॅनेजरला सांगितलं होतं." 

टॅग्स :माहिती व प्रसारण मंत्रालयसेलिब्रिटी