Ajith Car Accident Video: साउथ सुपरस्टार अभिनेता अजित कुमार याचा नुकतंच दुबईत भीषण अपघात झाला. "Dubai 24H" या शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण घेत असताना रेसिंग कार ट्रॅकजवळ असलेल्या बॅरिकेट्सवर आदळली. त्यानंतर कार 7 वेळा जागेवरच गोल-गोल फिरली आणि थेट भिंतीला जाऊन जोरदार धडकली. हा अपघात अत्यंत भयानक होता. सुदैवानं या अपघातात अजित यांना दुखापत झाली नाही. अजित कुमार रेसिंग टीम मॅनेजर आणि ड्रायव्हर फॅबियन ड्यूफिक्स यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे अभिनेत्याचं हेल्थ अपडेट दिलं आहे.
भीषण अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते तर हादरूनच गेले. अजित कुमारची तब्येत कशी आहे, याची चिंता लागली आहे. अपघातात पोर्श 992 कारचं मोठे नुकसान झालं आहे. मात्र, अजितला एक ओरखडाही लागला नाही, ही दिलासादायक बाब आहे. फॅबियन डफीक्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याने इंस्टाग्रामवर लिहिले, "चाचणीचा पहिला दिवस संपला आहे. अजित सुरक्षित आहे, कोणत्याही स्क्रॅचशिवाय... आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे".
फॅबियनने या पोस्टमध्ये अपघातामधून काय शिकण्यास मिळालं, यावरही आपले विचार मांडले. त्याने लिहिले, "शिकण्याचा प्रवास कधीच संपत नाही, हे शिकवणारा आजचा दिवस होता. कोणतीही अडचण आली तरी, रेसिंगची आमची आवड आम्हाला पुढे चालू ठेवण्यासाठी, सुधारत राहण्यासाठी आणि प्रत्येक अनुभवातून शिकत राहण्यासाठी प्रेरित करते. पुढचा रस्ता अजूनही धड्यांनी भरलेला आहे आणि आम्ही एक संघ म्हणून, एक कुटुंब म्हणून या सर्वांचा सामना करण्यास तयार आहोत". दरम्यान, अजितच्या चाहत्यांनी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरूवात केली आहे.
अजित कुमार अभिनेता असण्यासोबतच एक अनुभवी रेसर देखील आहे. तो सध्या दुबईत होणाऱ्या चॅम्पियनशिपसाठी तयारी करत असून पहिले सराव सत्र सुरू झाले आहे. 12 आणि 13 जानेवारी रोजी होणाऱ्या 24H दुबई 2025 शर्यतीत तो सहभागी होणार आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अजितचे चाहते त्याच्या दोन चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिला चित्रपट विदामुयर्ची आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर 'Good Bad Ugly' मुळेही तो चर्चेत आहे. 6 जानेवारी रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले होते, जे पाहून सोशल मीडियावर चाहत्यांची उत्कंठा वाढली होती.