Ajith Kumar Vidaamuyarchi : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा-2' या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी प्रचंड गोंधळ झाला होता, ज्यात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. आता गुरुवारी(6 फेब्रुवरी) आणखी एका साऊथ सुपरस्टारचा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे तशाच प्रकारचा गदारोळ झाला. हा सुपरस्टार दुसरा कोणी नसून तमिळ अभिनेता थाला अजित कुमार (Ajith Kumar) आहे. अजित कुमार यांचा 'विधामुर्याची' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, पहाटे 4 वाजताचा शो पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली.
आपल्या लाडक्या सुपरस्टारचा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी चक्क थिएटरमध्येच फटाके फोडले. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. थिएटरशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यावरही फटाक्यांची आतिशबाजी पाहायला मिळाली. चाहत्यांनी इतकी गर्दी केली की, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, अशा घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकदा असे प्रकार पाहायला मिळतात. तेथील चाहत्यांचे आपल्या हिरोवर प्रचंड प्रेम आहे, ज्यामुळे कधीकधी चाहते उत्साहाच्या भरात नको त्या गोष्टी करतात..
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अनेक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आले आहेत, ज्यात चाहते चित्रपटाच्या रिलीजचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. काही व्हिडिओमध्ये तर चाहते पोलिसांशी वाद घालताना दिसतात.
चित्रपटाची स्टारकास्टदिग्दर्शक मगिझ थिरुमेनी यांच्या विदामुयार्ची चित्रपटात अजित कुमार आणि त्रिशा कृष्णन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय, या चित्रपटात कन्नड सुपरस्टार अर्जुन सारजादेखील आहे. हा चित्रपट 1997 च्या अमेरिकन चित्रपट ब्रेकडाउनचा तामिळ रिमेक आहे. चित्रपट आज रिलीज झाला असून, पहिल्याच दिवशी चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय.