Join us

दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावणार 'पुष्पाराज', 'या' अटींवर अल्लू अर्जुनला मिळाला जामीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:31 IST

अल्लू अर्जूनला नामपल्ली न्यायालयाने अटी आणि शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे.  

Allu Arjun : हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी (Hyderabad Sandhya Theatre Stampede Incident) पुष्पा फेम अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. अल्लू अर्जुनला नामपल्ली न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. अल्लू अर्जुनला जामीन मिळाला असला तरी काही अटी आणि शर्तींमध्ये तो अडकला आहे. जामीन देताना कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. त्या अटींनुसार आज अभिनेत्यानं पोलिस ठाण्यात हजेरी लावली. 

अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.  त्यानंतर तो अंतरिम जामिनावर बाहेर होता. 27 डिसेंबर रोजी अभिनेता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर झाला होता. त्यानंतर 30 डिसेंबर न्यायालयात सुनावणी झाली आणि जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला होता. अखेर 3 जानेवारी रोजी अल्लू अर्जूनला नामपल्ली न्यायालयाने अटी आणि शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे.  

या अटींवर जामीन मंजूर!

  • दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे.  दोन महिने किंवा आरोपपत्र दाखल होईपर्यंत हे सुरू राहील.
  • कोर्टाला पूर्वसूचना न देता निवासी पत्ता बदलू नये.
  • पूर्वपरवानगीशिवाय देश सोडण्यासही मनाई.
  •  तपासात कोणत्याही प्रकारे अडथळा आणणार नाही.

 

 संध्या थिएटरमध्ये काय घडलं होतं?

 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अचानक अल्लू अर्जुन तिथे आल्याने चाहत्यांनी एकच गर्दी केली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यात रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. तर त्या महिलेच्या नऊ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. सध्या मुलावर उपचार सुरू असून तो प्रतिसाद देतोय. दरम्यान, अल्लू अर्जुनने मृतांच्या कुटुंबीयांना 2 कोटी रुपये देण्याची घोषणाही केली होती.

टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटीपोलिस