Join us

अल्लू अर्जुनने 'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेत जखमी झालेल्या मुलाची भेट न घेण्याबद्दल वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:21 IST

तेलुगू सुपरस्टार, अभिनेता अल्लू अर्जुनची (Allu Arjun) सध्या 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.

Allu Arjun Father Reaction: तेलुगू सुपरस्टार, अभिनेता अल्लू अर्जुनची (Allu Arjun) सध्या 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चा होत आहे. ५ डिसेंबरच्या दिवशी हा बहुप्रतीक्षित सिनेमा जगभरात प्रदर्शित करण्यात आला. एकीकडे या अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाची क्रेझ असताना त्याच्या प्रदर्शनापूर्वी ४ डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २: द रुल' चा प्रिमियर ठेवण्यात आला होता. परंतु त्यावेळी कोणतीही पूर्वकल्पना न  देता अचानक अल्लू अर्जुनने या थिएटरमध्ये हजेरी लावली. यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्याला जवळून पाहण्यासाठी धावाधाव केली. याचा परिणाम असा झाला की त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि दुर्घटना घडून त्यात ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मुलगाही यामध्ये गंभीर जखमी झाला. सध्या या मुलावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नुकतीच अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी त्याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. 

दरम्यान, निर्माते अल्लू अरविंद यांनी मृत महिला रेवती यांच्या पतीची सुद्धा भेट घेतली. शिवाय रुग्णालयात जाऊन त्यांचा मुलगा श्रीतेजला देखील ते भेटले.  त्यानंतर सोशल मीडियावर अल्लू अरविंद यांनी व्हिडीओ शेअर करत श्रीतेजची हेल्थ अपडेट दिली. सोबतच त्यांनी मीडियासोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान ते म्हणाले, "नुकतीच मी श्रीतेजची भेट घेतली आणि त्याच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांसोबतही माझं बोलणं झालं. मागील १० दिवसांत त्याच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनाही जाणवलं आहे. परंतु तो अजून पूर्णपणे बरा झालेला नाही, त्यासाठी अजूनही थोडा वेळ लागेल. तो बरा व्हावा यासाठी आमचेही प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर आम्ही प्रशासनाचेही आभारी आहोत की ते सुद्धा या मुलाच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. "

अल्लू अर्जुनने 'या' कारणामुळे पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही

पुढे ते म्हणाले, "बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे की,अल्लू अर्जुने अद्यापही या मुलाची भेट का घेतली नाही? संध्या थिएटरमध्ये झालेल्या प्रकरणानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी अल्लू अर्जुन त्या मुलाला भेटणार होता. परंतु काही सुरेक्षच्या कारणास्तव रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही त्याला भेटू नये असा सल्ला दिला. नेमकं त्याच दिवशी त्याला अटक करण्यात आलंं."

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पासेलिब्रिटीसिनेमा