अभिनेता अल्लू अर्जुन म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार. अल्लू अर्जुन फक्त भारतात स्टार राहिलेला नाही तर ग्लोबल स्टार बनलाय. आता तर त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. होय, वाढत्या लोकप्रियतेने 'पुष्पा'ला मादाम तुसां संग्रहालयात पोहचवले आहे. लंडनमधील मादाम तुसां संग्रहालयात अल्लू अर्जूनचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
अल्लू अर्जुनचा लंडनमध्ये मेणाचा पुतळा बसवण्याची तयारी जोरात सुरू आहे. येत्या दोन दिवसात अल्लू अर्जुन लंडनला रवाना होईल. जिथे पुतळा तयार करण्यासाठी त्याचे मोजमाप घेतले जाईल. 2024 मध्ये या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे मानले जात आहे.
पुतळा तयार झाल्यानंतर अल्लू अर्जुन दक्षिणेतील चौथा सुपरस्टार असेल ज्याचा मेणाचा पुतळा मादाम तुसांमध्ये संग्रहालयात ठेवला जाईल. अल्लू अर्जुनच्या आधी प्रभास, महेश बाबू आणि काजल अग्रवाल यांचे मेणाचे पुतळे संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.
शिवाय, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, सलमान खान, दीपिका पदुकोण, करीना कपूर यांच्यासह अनेक कलाकारांचे मेणाचे पुतळे आधीच तयार करण्यात आले आहेत. आता या अभिनेत्यांच्या यादीत अल्लू अर्जुनचे नावही सामील होणार आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द रूल' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'पुष्पा द राईज' मधला पुष्पाचा तो लूक आणि त्या पात्रांची स्टाईल लोकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर आता पुढच्या पार्टमध्ये काय असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'पुष्पा: द राइज' १७ डिसेंबर २०२१ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
या चित्रपटामधील अल्लू अर्जुनच्या झुकेगा नहीं साला या डायलॉगची प्रेक्षकांमध्ये क्रेझ निर्माण झाली होती. स्वांतत्र्यदिनाच्या मुहुर्तावर १५ ऑगस्ट २०२४ या दिवशी ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहद फॉसिल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.