सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नासर यांना पितृशोक झाला आहे. नासर यांचे वडील महबूब बाशा यांचं निधन झालं आहे. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नासर यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नासर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी(११ ऑक्टोबर) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महबूब बाशा यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.दागिन्यांच्या दुकानात काम करणाऱ्या महबूब बाशा यांना सुरुवातीपासूनच आपल्या मुलाला अभिनेता बनवायचं होतं. म्हणूनच त्यांनी नासर यांना अभिनयाच्या शाळेत घातलं होतं. अभिनयातील शिक्षण घेतल्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नासर यांनी हॉटेलमध्ये कामंही केलं होतं.
नासर हे तमिळ आणि तेलुगु सिनेसृष्टीतील लोकप्रयि अभिनेते आहेत. गेली जवळपास ४० वर्ष ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांनी 'थेवर मगन', 'देवथाई', 'गोलीमार', 'पोकीरी', 'बिजनेसमॅन', 'शक्ती' अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. 'बाहुबली' सिनेमातील त्यांच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. तमिळ आणि तेलुगुबरोबरच 'लगान', 'चाची ४२०', 'फिर मिलेंगे', 'निशब्द', 'राऊडी राठोड', 'साला खडूस' या चित्रपटातही ते झळकले आहेत.