बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेला 'कंगुआ' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'अॅनिमल'नंतर बॉबी देओलच्या 'कंगुआ' या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. या सिनेमातील बॉबी देओलच्या लूकच्या पहिल्या पोस्टरची प्रचंड चर्चाही झाली होती. तेव्हापासूनच 'कंगुआ' सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर १४ नोव्हेंबरला 'कंगुआ' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला.
बॉबी देओल, साउथ सुपरस्टार सूर्या, दिशा पटानी अशी स्टारकास्ट असलेल्या 'कंगुआ' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ३००-३५० कोटीचं बजेट असलेला 'कंगुआ' हा बिग बजेट सिनेमा आहे. मात्र पहिल्या दिवशी या सिनेमाला फार चांगली कमाई करता आलेली नाही. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी २२ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे बजेटच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर सिनेमाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. आता येणाऱ्या दिवसात हा सिनेमा किती कमाई करतो हे पाहावं लागेल.
अॅनिमलनंतर बॉबी देओलच्या 'कंगुआ' सिनेमासाठी चाहते उत्सुक होते. अॅनिमलने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी तब्बल ६३ कोटींचा गल्ला जमवला होता. 'कंगुआ'मधून बॉबी देओलचा वेगळी अवतार पाहण्यासाठी चाहते आतुर होते. मात्र प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यात हा सिनेमा फारसा यशस्वी ठरत नसल्याचं दिसत आहे.
'कंगुआ' सिनेमाचं दिग्दर्शन सिवा यांनी केलं आहे. या सिनेमात बॉबी देओल, सूर्या आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर नटराजन सुब्रमण्यम, के. एस. रविकुमार, योगी बाबू, रेडिन किंग्सले, कोवई सरला, रवी राघवेंद्र, कार्थी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाचा सीक्वलही प्रदर्शित केला जाणार आहे.