'कांतारा चाप्टर 1' सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. या सिनेमाच्या सेटवर एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर येतेय. 'कांतारा चाप्टर 1'च्या कलाकारांना घेऊन जाणारी बस पलटी झाल्याने सहा कलाकार जखमी झाल्याची गोष्ट घडलीय. या बसमध्ये एकूण २० लोक होते. त्यामधील सहा ज्युनियर कलाकार जखमी झालेत. PTI ने याविषयी वृत्त शेअर केलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण २० कलाकार या बसमध्ये होते. त्यापैकी सहा जण या दुर्घटनेमुळे जखमी झाले.
'कांतारा चाप्टर 1'च्या कलाकारांसोबत दुर्घटना
पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री जडकाल भागात ही दुर्घटना घडली. सिनेमाची टीम मिनी बसमधून प्रवास करत होती. जडकाल भागात मुदूर येथील शूटिंग संपल्यावर कोल्लूर येथे सिनेमाची टीम परतत होती. त्यावेळी या मिनी बसमध्ये एकूण २० ज्यूनियर कलाकार होते. बस अचानक पलटी झाल्याने २० पैकी सहा कलाकार गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
जखमींवर उपचार सुरु
या दुर्घटनेत जखमी कलाकारांना जडकाल आणि कुंदापूर भागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कोल्लूर पोलीस या दुर्घटनेची सखोल चौकशी करत आहेत. या दुर्घटनेमुळे सिनेमाच्या शूटिंगवर निश्चितच परिणाम घडणार आहे. 'कांतारा'च्या घवघवीत यशानंतर 'कांतारा चाप्टर 1'ची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. दरम्याने ऋषभ शेट्टी पुन्हा एकदा 'कांतारा चाप्टर 1'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून हा सिनेमा २ ऑक्टोबर २०२५ ला भेटीला येणार आहे.