दक्षिणेतील अभिनेता विशालने 'सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेश'नवर लाच घेतल्याचा आरोप केला. नुकतचं विशालचा 'मार्क अँटनी' हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन पास करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने साडेसहा लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप विशालने केला. विशालच्या आरोपांची गंभीर दखल सीबीआयने घेतली आहे. 'सेन्सॉर बोर्ड' भ्रष्टाचाराचा तपास आता सीबीआयने आपल्या हाती घेतला आहे.
सीबीआयने कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन आणि मुंबई लोकसेवकांसह तीन खाजगी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या तपासात मर्लिन मेनागा, जीजा रामदास आणि राजन एम, ही नावे समोर आली आहेत. सीबीआयने मुंबईसह चार वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींची आणि आरोपींशी संबंधित इतर लोकांची झडती घेतली. ज्यातून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
रिपोर्टनुसार, 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रमाणपत्र देण्यासाठी CBFC मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या वतीने, एका सेन्सॉरबोर्डाच्या बाहेरील व्यक्तीने आपल्या साथीदारांसोबत मिळून 7 लाख रुपयांची लाच मागितली. पण, वाटाघाटी करुन तक्रारदाराने साडे सहा लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. यानंतर हिंदी डब केलेल्या चित्रपटासाठी आवश्यक प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते.
अभिनेता विशालने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात त्याने सेन्सॉर बोर्डावर भष्ट्राचाराचा आरोप केला होता. शिवाय, त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत या प्रकरणाची चौकशी करावी, असे आवाहन केले. तर 'मार्क अँटोनी' या तमिळ चित्रपटात विशाल दुहेरी भूमिकेत आहे. या सायन्स फिक्शनमध्ये एसजे सूर्या, रितू वर्मा आणि सुनील यांच्यासह अनेक कलाकार दिसले आहेत.