अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna) सध्या 'छावा' (chhaava) सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. रश्मिका सध्या भारतीय मनोरंजन विश्वात अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहे. 'पुष्पा २', 'छावा' आणि आगामी 'सिकंदर' सिनेमामुळे रश्मिका सध्या बिग बजेट सिनेमांची लोकप्रिय नायिका बनली आहे. अशातच रश्मिकाविषयी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे काँग्रेसच्या एका आमदाराने रश्मिकाला खुलेआम धमकी दिली आहे. त्यामागचं कारणही समोर आलंय.काँग्रेस आमदाराने रश्मिकाला दिली धमकी
काँग्रेसचे कर्नाटकातील आमदार रवीकुमार गोवडा गनिगा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रश्मिकाला उद्देशून वक्तव्य केलं की, "रश्मिकाने किरीक पार्टी या कन्नड सिनेमातून करिअरला सुरुवात केली. परंतु गेल्या वर्षी आम्ही जो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला होता त्यासाठी रश्मिकाला निमंत्रण दिलं होतं. परंतु माझं हैदराबादमध्ये घर आहे आणि मला कर्नाटक कुठे माहित नाही. माझ्याकडे वेळ नाही अशी कारणं देऊन रश्मिकाने यायला मनाई केली."
"याशिवाय माझा एक मित्र तिच्या घरी १०-१२ वेळा तिला फिल्म फेस्टिव्हलला निमंत्रण देण्यासाठी जाऊन आला. परंतु तरीही तिने मनाई केली. ज्या ठिकाणी रश्मिकाच्या करिअरची सुरुवात झाली आहे त्या कन्नड भाषेकडे तिने दुर्लक्ष केलं आणि निमंत्रणाला मनाई केली. त्यामुळे आम्ही तिला चांगलाच धडा का शिकवू नये?" अशाप्रकारे कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने सर्वांसमोर रश्मिकाला धमकी दिली. आता या प्रकरणी रश्मिका काय स्पष्टीकरण देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.