Join us  

खरंच की काय? राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेसाठी प्रभासने दिले ५० कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 6:31 PM

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी ५० कोटी दिल्याची चर्चा आहे. 

अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपू्र्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी राम मंदिरासाठी खारीचा वाटा उचलल्याचं समोर आलं होतं. आता दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने या सोहळ्यासाठी ५० कोटी दिल्याची चर्चा आहे. 

प्रभास राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील खाण्यापिण्याचा खर्च करणार असल्याची चर्चा होती. यासाठी त्याने ५० कोटी रुपये दान केले असल्याचंही बोललं जात होतं. याबाबत अद्याप प्रभासने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, प्रभासच्या टीममधील एका व्यक्तीने ही माहिती खोटी असल्याचं म्हटलं आहे. इंडिया टुडेशी याबाबत भाष्य करताना ते म्हणाले, "प्रभासने राम मंदिरासाठी ५० कोटी रुपयांचं दान केलेलं नाही. शिवाय प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील जेवणाचा खर्च उचलणार असल्याचंही तो म्हणाला नाही." त्यामुळे प्रभासने याप्रकारचं कोणतंच दान केलेलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

प्रभास हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ओम राऊतच्या 'आदिपुरुष' सिनेमात प्रभासने प्रभू श्रीराम ही भूमिका साकारली होती. व्हीएफएक्स आणि संवादामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. प्रभासबरोबर या सिनेमात क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत होते.  

टॅग्स :प्रभासराम मंदिरअयोध्या