डिसेंबर महिन्यात चित्रपटप्रेमींना सिनेमांची जणू मेजवानीच मिळाली. वर्षाअखेरीस अनेक मोठे सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. डिसेंबरच्या सुरुवातीलाच 'सॅम बहादूर' आणि 'ॲनिमल' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळाली. तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 'डंकी' आणि 'सालार' हे बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. शाहरुख खान आणि प्रभासच्या सिनेमांत बॉक्स ऑफिसवर लढत पाहायला मिळत आहे. पण, शाहरुखच्या 'डंकी'वर प्रभासचा 'सालार' भारी पडल्याचं चित्र आहे.
'पठाण', 'जवान'नंतर किंग खानच्या 'डंकी'साठी चाहते उत्सुक होते. २१ डिसेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. शाहरुख खान, विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणींनी केलं आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी २९ कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली होती. पहिल्याच आठवड्यात डंकीने १६० कोटींचा गल्ला जमवला. तर आत्तापर्यंत या सिनेमाने देशात १७६ कोटींची कमाई केली आहे. पण, प्रभासच्या 'सालार'पुढे डंकी मात्र फिका पडला आहे.
प्रभास मु्ख्य भूमिकेत असलेला 'सालार' सिनेमा २२ डिसेंबरला प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाची प्रचंड क्रेझ होती. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून कोटींची कमाई केली होती. हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'सालार'ने पहिल्याच दिवशी ९० कोटींचा गल्ला जमवत डंकीला मागे टाकलं. आतापर्यंत सालाने ३२९ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने ४८५ कोटींची कमाई केली आहे.
'सालार'चं दिग्दर्शन केजीएफ फेम प्रशांत नील यांनी केलं आहे. या सिनेमात प्रभासबरोबर श्रुती हसनही मुख्य भूमिकेत आहे. तर पृथ्वीराज सुकुमारन, जगपति बाबू रेडी, टीनू देसाई या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.