मनोरंजन विश्वातून गेल्या काही दिवसांपासून अनेक चिंताजनक आणि धक्कादायक बातम्या कानावर पडत आहेत. काही दिवसांपुर्वी मिथुन चक्रवर्ती यांना अचानक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. अशातच ६५ वर्षीय दिग्दर्शक प्रकाश कोलेरी (Prakash Koleri) यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आलीय. वायनाड येथील राहत्या घरी प्रकाश मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्रकाश गेल्या अनेक वर्षांपासून घरी एकटे राहत होते. काही दिवसांपासून त्यांच्याशी कोणाचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी घरी तपास करता ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृत्युचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेस. सध्या शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांंनी प्रकाश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.
१९८७ साली आलेल्या ‘मिजियिथलिल कन्नीरुमयी’ सिनेमातून प्रकाश यांनी दिग्दर्शकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पुढे २०१३ साली प्रकाश यांचा ‘पट्टुपुष्ठकम’ शेवटचा सिनेमा रिलीज झाला. २०१३ नंतर प्रकाश मनोरंजन विश्वात इतके सक्रीय नव्हते. प्रकाश यांच्या निधनाने मल्याळम सिनेसृष्टीतील एक दिग्गज व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे.