Join us  

हिंदीतील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिसऱ्या स्थानावर 'कल्की', 'आरआरआर'ला मागे टाकले

By संजय घावरे | Published: July 24, 2024 9:29 PM

Cinema News:

मुंबई - मागील काही वर्षांपासून बिग बजेट पॅन इंडिया चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. याचा दाक्षिणात्य चित्रपटांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून, हिंदी भाषेतील दाक्षिणात्य चित्रपटांचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. या यादीत 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत करत धडाकेबाज व्यवसायाला सुरुवात केली. मूळ तेलुगू भाषेतील या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही पहिल्या दिवसापासून चांगली कमाई सुरू केली. याच बळावर या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने व्यवसायाच्या बाबतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. चित्रपटाचा मूळ गाभा, पटकथा आणि अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन, दिशा पटाणी यांच्यासोबतच सर्व कलाकारांच्या अभिनयाने रसिकांच्या मनावर गारूड केले. मागील काही वर्षांमध्ये हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही दाक्षिणात्य चित्रपटांची गोडी लागली आहे. 'कल्की'ने हिंदी भाषिक रसिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्याचा फायदा चित्रपटाला झाल्याचे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रदर्शित झाल्यानंतर २७ दिवसांमध्ये या चित्रपटाने ६२० कोटी रुपयांच्या आसपास व्यवसाय केला आहे. हिंदी 'कल्की'ने जवळपास २७६ कोटी रुपयांची कमाई करत यात मोलाचे योगदान दिले आहे. हिंदी चित्रपटाच्या व्यावसायिक आकड्यांच्या बळावर 'कल्की'ने एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाला मागे टाकले आहे. हिंदी 'आरआरआर'ने २७४.३१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हिंदी 'कल्की'ने केवळ २५ दिवसांत 'आरआरआर'ला ओव्हरटेक केले आहे. 

हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या यादीत एसएस राजामौली दिग्दर्शित प्रभासचा हिंदी 'बाहुबली २' पहिल्या स्थानावर विराजमान आहे. हिंदी 'बाहुबली २'ने ५१०.९९ कोटी रुपयांचा बिझनेस केल्याची माहिती आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपयांहून अधिक, तर जागतिक पातळीवर १७८८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'बाहुबली २'च्या मागोमाग हिंदी 'केजीएफ २' दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रशांत नील दिग्दर्शित यात यशसोबत संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज आदी कलाकार आहेत. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने ३५३ कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. जागतिक पातळीवर १२०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने भारतात १००० कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याची माहिती आहे.

टॅग्स :सिनेमा