ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा'(Kantara Movie)मध्ये झळकलेला अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) नुकताच गोव्यात पोहोचला. जिथे तो ५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाला होता. यादरम्यान ऋषभ शेट्टी कन्नड चित्रपटांबाबत आपली व्यथा मांडताना दिसला. यावेळी त्याने कन्नड सिनेइंडस्ट्री आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल बरेच काही सांगितले. अभिनेत्याने सांगितले की, कन्नड चित्रपटांना अजूनही ओटीटीवर स्थान मिळत नाही.
५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऋषभ शेट्टीने प्रसारमाध्यमांसोबत मोकळेपणाने संवाद साधला आणि सांगितले की, सध्या ओटीटीचे युग आहे आणि कन्नड चित्रपटांना अजूनही ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्थान मिळत नाही. जे खूप वाईट लक्षण आहे. अभिनेत्याने सांगितले की ओटीटीवर कन्नडसाठी कोणतेही सबस्क्रायबर नाहीत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे.
यावेळी ऋषभ शेट्टीने असेही सांगितले की, “कोरोनाच्या काळातही दोन प्रॉडक्शन हाऊस त्यांचे काम सातत्याने करत आहेत. त्यातील एक रक्षित शेट्टीचा परम स्टुडिओ आणि माझे चित्रपट होते. याशिवाय इतर काही प्रॉडक्शन हाऊसेसही सातत्याने चित्रपट बनवत होते, पण ते आमचे चित्रपट घेत नव्हते. ओटीटी प्लॅटफॉर्मचे म्हणणे आहे की त्यांना कन्नड चित्रपट स्वीकारण्यास वेळ लागेल. आता आम्ही त्यांचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत आहोत.
'कांतारा १'च्या टीझरला मिळतोय चांगला प्रतिसादयावेळी अभिनेता ऋषभ शेट्टी इफ्फी आणि त्याच्या प्रायोजकांना कन्नड चित्रपटांना मान्यता देण्याचे आवाहन करताना दिसला. कन्नड चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्थान मिळाला पाहिजे, असेही त्याने सांगितले. सध्या 'कांतारा -१' चा टीझर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. टीझरमध्ये ऋषभ शेट्टी धोतर परिधान केलेल्या आणि त्रिशूळ आणि कुऱ्हाडी हातात धरलेल्या डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.