Join us

Made In India: राजामौलींच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा, दादासाहेब फाळकेंवर आधारित आहे सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 15:15 IST

एस एस राजामौलींचा हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतही रिलीज होणार आहे.

'बाहुबली' आणि 'RRR' च्या घवघवीत यशानंतर आता दिग्दर्शक एस एस राजामौली (S S Rajamouli) यांनी नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. हा नवा सिनेमा देशातील सर्वच नागरिकांची उत्सुकता वाढवणारा आहे. याचं नाव आहे 'मेड इन इंडिया' (Made in India). भारतीयसिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर हा सिनेमा आधारित असेल. कारण 'मेड इन इंडिया' भारतीय सिनेमाची कहाणी दाखवणार आहे. दादासाहेब फाळकेंनी भारतीय सिनेमाचा पाया रचला. 1913 साली त्यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला मूक सिनेमा बनवला.

भारतीय सिनेमाची कहाणी 'मेड इन इंडिया'

आजच राजामौलींच्या नवीन प्रोजेक्टची माहिती मिळाली. भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या दिवसांना मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी राजामौली तयारी करत आहेत. माध्यम रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा राजामौली स्वत: दिग्दर्शित करणार नाहीत मात्र या सिनेमाची स्केल राजामौलींच्या इतर सिनेमांइतकीच ग्रँड असेल. त्यांनी आपल्या अधिकृत अनाऊंसमेंटमध्ये सिनेमाचं नाव जाहीर केलं.

'मेड इन इंडिया' शी राजामौलींनी जोडलं जाणं ही मोठी गोष्ट आहे. कारण राजामौलींनी त्यांचं नाव जगभरात गाजवलंय. सिनेमाची निर्मिती वरुण गुप्ता आणि राजामौलींचा मुलगा एसएस कार्तिकेय करणार आहे. तर नितीन कक्कर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. राजामौलींनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, 'जेव्हा मी पहिल्यांदा सिनेमाची गोष्ट ऐकली मी पुरता भावूक झालो. एखादा चरित्रपट बनवणं मूळातच कठीण असतं पण भारतीय सिनेमाच्या जनकाची गोष्ट दाखवणं हे त्याहून जास्त आव्हानात्मक आहे. आमची मुलं सज्ज आहेत. अभिमानाने प्रस्तुत करतो, 'मेड इन इंडिया'.

दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी याआधीही अनेक सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. 'फिल्मीस्तान' आणि 'जवानी जानेमन' या हिंदी सिनेमांचंही त्यांनी दिग्दर्शन केलंय. 'मेड इन इंडिया' ६ भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळमसोबतच मराठीतही रिलीज होईल. सध्या फिल्मची केवळ घोषणा झाली असून अद्याप सिनेमाच्या कास्टिंगबद्दल काहीही समोर आलेलं नाही.

टॅग्स :एस.एस. राजमौलीसिनेमाभारत