केरळमधील मल्याळम अभिनेत्री हनी रोजबाबत (Honey Rose) एक बातमी सध्या चर्चेत आहे. केरळपोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने बुधवार प्रसिद्ध उद्योगपती बॉबी चेमन्नूरला अटक केली आहे. अभिनेत्री हनी रोजने बॉबी विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने तिने ही तक्रार केली. संपूर्ण प्रकरण काय वाचा.
पीटीआय रिपोर्टनुसार, ज्वेलरी बिझनेसमन बॉबी चेम्मनुरला वायनाड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री हनी रोजच्या तक्रारीनंतर बॉबीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला. हनीने आपल्या तक्रारीत बिझनेसमन सतत अश्लील कमेंट करत असल्याचा आरोप केला. ती म्हणाली, "५ जानेवारी रोजी रविवारी बॉबी सतत तिच्या फेसबुक पोस्टवर डबल मीनिंग अश्लील कमेंट्स करत होता. तसंच इव्हेंट्समध्ये तिचा पाठलागही करत होता. मी इतर वेळी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते मात्र या प्रकरणात अपमान सहन करता प्रतिक्रिया देणं गरजेचं होतं. हा व्यक्ती मी ज्या ज्या कार्यक्रमांमध्ये आमंत्रित असायचे तिथे यायचा आणि सार्वजनिकरित्या अपमानजनक कमेंट पास करायचा."
पोलिसांच्या कारवाईनंतर अभिनेत्री म्हणाली, "आज माझा दिवस अगदी शांततेत जाईल. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनाच मी थेट यासंदर्भात माहिती दिली होती. तसंच यामध्ये त्याच्यावर कडक कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं."
हनी रोज ही साऊथ अभिनेत्री आहे. विशेषत: मल्याळम सिनेमांमध्ये ती सक्रीय आहे. तिने तमिळ आणि तेलुगुमध्येही काम केलं आहे. २०२३ साली सुपरस्टार नंदमुरी बालकृष्णन यांच्या 'वीर सिम्हा रेड्डी' सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती.