Join us  

मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ, अभिनेत्रींनी केले लैंगिक शोषणाचे आरोप; मोहनलाल यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 2:00 PM

हेमा समितीने दिलेल्या रिपोर्टमध्ये मल्याळम सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलं.

काही वर्षांपूर्वी महिला अत्याचाविरोधात मी टू मोहिम आली होती. या मोहिमेंतगर्त हॉलिवूड नंतर बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. आता असंच काहीसं मल्याळम सिनेसृष्टीत सुरु झालं आहे. हेमा समितीने दिलेल्या रिपोर्टमध्ये मल्याळम सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलं. यानंतर असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्टच्या अध्यक्षपदावर असलेले सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) यांनी राजीनामा दिला आहे.

उत्कृष्ट चित्रपट म्हणून वर येत असलेली मल्याळम सिनेसृष्टी आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तेथील अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणची तक्रार केली आहे. त्यातच हेमा समितीने दिलेल्या अहवालातही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेते, दिग्दर्शकांवर महिलांनी आरोप केले आहेत. अनेक अभिनेत्रींनी तर आतापर्यंत या कारणामुळे करिअरही सोडलं आहे. सुरुवातीला बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्राने मल्याळम अभिनेते रंजीत यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले. याशिवाय अभिनेत्री मीनू कुरियननेही फेसबुक पोस्ट करत ७ जणांविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप लावले. 

एकामागोमाग झालेल्या या प्रकरणांनंतर मोहनलाल यांच्यासोबतच मल्याळम सिनेअसोसिएशनमधील इतर सदस्यांनीही राजीनामा दिला. संपूर्ण देशात मल्याळम सिनेसृष्टीतील आरोपांमुळे आता खळबळ माजली आहे. 

काय आहे हेमा कमिटी?

गेल्या अनेक वर्षांपासून प्रादेशिक चित्रपटसृष्टीशी संबंधित अशा अनेक घटना समोर येत आहेत, ज्यामध्ये महिला कलाकारांना चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात अनेक बड्या चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याकडून आक्षेपार्ह मागणी केल्याचे उघड झालं आहे. शूटिंगदरम्यान त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे काही महिला कलाकारांनी सांगितले आहे. या वाढत्या केसेस पाहता २०१९ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती हेमा यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती, जी अशा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवत होती. समितीच्या स्थापनेनंतर सुमारे ४ वर्षांनी १९ ऑगस्टला हेमा समितीने केरळ सरकारला २३३ पानांचा अहवाल सादर केला. ज्यामध्ये अनेक बड्या कलाकारांकडून होणारे शोषण समोर आले. रिपोर्ट्स येताच अनेक अभिनेत्री आपल्यासोबत झालेल्या शोषणाचा खुलासा करत आहेत.

टॅग्स :Tollywoodलैंगिक छळसिनेमासेलिब्रिटी