अभिनेता नागा चैतन्य (Chaitanya Akkineni) आणि अभिनेत्री साई पल्लवी यांचा 'थंडेल' (Thandel) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली आहे. हा थ्रिलर-ड्रामा गेल्या २१ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. ७ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'थंडेल'ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.
'थंडेल' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. सिनेमात साई पल्लवी आणि नागा चैतन्य यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. तमिळ असो किंवा हिंदी कोणताही चित्रपट थिएटरमधून काढून टाकल्यानंतरच तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जातो. काही चित्रपट एका महिन्याच्या आत तर काही दोन ते तीन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित होतात. 'थंडेल' च्या बाबतीतही असंच काहीसं घडणार आहे. एक महिना आणि ७ दिवसांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो.
रिपोर्टनुसार, 'थंडेल' १४ मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. तथापि, निर्मात्यांनी किंवा नेटफ्लिक्सने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सॅकॅनिल्कनुसार, 'थंडेल'ने जगभरात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'थंडेल'बद्दल बोलायचं झालं तर, या सिनेमाची कथा काही मच्छिमारांभोवती फिरते. काही मच्छीमार मासेमारीसाठी गुजरातला जातात आणि चुकून पाकिस्तानात पोहोचतात. या चित्रपटात पाकिस्तानी तुरुंगात मच्छिमारांवर कसा अत्याचार केला जातो आणि त्यांना देशात परत कसं आणलं जातं, हे पाहायला मिळतंय.