दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने काही दिवसांपूर्वीच शोभिता धुलिपालाशी लग्न करत पुन्हा नव्याने संसार थाटला. दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच नागा चैतन्यने समांथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं आहे. एक नातं तुटल्यामुळे आता नातं तोडताना १००० वेळा विचार करत असल्याचं नागा चैतन्यने सांगितलं. समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. तर २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. आता जवळपास ४ वर्षांनी त्याने समांथासोबतच्या घटस्फोटावर मौन सोडलं आहे.
काय म्हणाला नागा चैतन्य?
आमचे रस्ते वेगळे होते. काही कारणांमुळे आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही एक दुसऱ्याचा आदर करतो. आम्ही जीवनात पुढे जात आहोत. यापेक्षा आणखी किती स्पष्टीकरण द्यायचं हे मला समजत नाही. मला आशा आहे की चाहते आणि मीडिया आमच्या या गोष्टीचा आदर करतील. कृपया करून आमचा आदर करा आणि आम्हाला प्रायव्हसी द्या. पण, दुर्देवाने हा चर्चेचा विषय बनला आहे. मी खूप सभ्यतेने जीवनात पुढे जात आहे आणि तीदेखील पुढे जात आहे. आम्ही आमचं आयुष्य आनंदाने जगत आहोत.
मला पुन्हा प्रेम मिळालं आहे. मी खूप खूश आहे. पण, हे फक्त माझ्या आयुष्यात घडतंय असं नाही. मग, मला आरोपी असल्यासारखी वागणूक का दिली जाते? आम्ही दोघांनी मिळून आमच्यासाठी चांगलं काय आहे, हा निर्णय घेतला. खूप विचार करूनच आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. माझ्यासाठी ही खूप भावनिक गोष्ट होती. एका विखुरलेल्या कुटुंबातून मी आलो आहे. त्यामुळे ती भावना कशी असते हे मला माहीत आहे. आणि म्हणूनच कोणतंही नातं तोडताना मी १००० वेळा विचार करतो. कारण याचे परिणाम मला माहीत आहेत.