Join us

Video : यंदाच्या ऑस्करमध्येही RRRची चर्चा! अवॉर्ड सोहळ्यात घुमला 'नाटू नाटू'चा आवाज, भारतीयांच्या माना उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:12 PM

96th Academy Awards : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एकाही भारतीय सिनेमाला अवॉर्ड मिळाला नाही. पण, तरीही या अवॉर्ड सोहळ्याने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

96th Academy Awards : मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा  ९६वा अकादमी पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना विविध श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एकाही भारतीय सिनेमाला अवॉर्ड मिळाला नाही. पण, तरीही या अवॉर्ड सोहळ्याने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

गेल्या वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एस.एस.राजामौली यांच्या RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला होता. ऑस्करच्या मंचावर 'नाटू नाटू' गाण्यावर परफॉर्मही करण्यात आलं होतं. 'नाटू नाटू'ने ऑस्कर २०२३मध्ये रंगत आणली होती. तर  ऑस्कर २०२४मध्येही RRRची चर्चा पाहायला मिळाली. बेस्ट ओरिजनल साँग या कॅटेगरीचे विजेते घोषित करण्याआधी ऑस्करच्या स्क्रीनवर नाटू नाटू हे गाणं वाजवलं गेलं. त्यामुळे पुन्हा एकदा ऑस्कर सोहळ्यात 'नाटू नाटू'चा आवाज घुमला. 

त्याबरोबरच अॅक्शन सिनेमांचा थरार स्क्रीनवर दाखवताना RRRमधील काही सीन्सही दाखविण्यात आले. याचे व्हिडिओ RRR टीमच्या सोशल मीडिया पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीयांच्या माना गर्वाने उंचावल्या आहेत. 

दरम्यान, यंदाच्या ऑस्करमध्ये 'ओपनहायमर', 'बार्बी' आणि 'पुअर थिंग्ज' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन होती. ऑस्कर २०२४मध्ये ओपनहायमर हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. तर किलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. 'ओपनहायमर'चे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारावर नाव कोरलं. तर यंदाच्या ऑस्करमध्ये इमा स्टोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. 'पुअर थिंग्ज'मधील अभिनयासाठी इमा स्टोनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

टॅग्स :ऑस्करआरआरआर सिनेमाराम चरण तेजाएस.एस. राजमौली