भारतीय मनोरंजन विश्वातील 'श्रीवल्ली' म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना. रश्मिका सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. रश्मिका गेली अनेक वर्ष हिंदी आणि दाक्षिणात्या सिनेमांमध्ये सक्रीय आहे. रश्मिकाने 'ॲनिमल' सिनेमात साकारलेली भूमिकाही चाहत्यांच्या पसंतीस उतरली. अशातच रश्मिकाने काही दिवसांपुर्वी मुंबईतील अटल सेतूवर प्रवास केला. यावेळी रश्मिकाने अटल सेतूचं बांधकाम आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. आता पंतप्रधान मोदींनी रश्मिकाच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिलीय.
पंतप्रधान मोदींनी रश्मिकाचा व्हिडीओ शेअर करत दिली प्रतिक्रिया
रश्मिकाने अटल सेतूवरचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ रिट्विट करुन पंतप्रधान मोदी म्हणाले, "नक्कीच! लोकांना जोडणे आणि जीवन चांगले बनवणे यापेक्षा अधिक समाधानकारक काहीही नाही." असं म्हणत पंतप्रधान मोदींनी रश्मिकाला प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाली होती रश्मिका
रश्मिकाने अटल सेतूवर प्रवास करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली होती, "नवी मुंबई ते मुंबई, गोवा ते मुंबई आणि बेंगळुरू ते मुंबई प्रवास आता खूप सोपा झाला आहे. ही अद्भुत पायाभूत सुविधा पाहून अभिमान वाटतो. आता भारताला विकासाच्या बाबतीत कोणीही रोखू शकत नाही. आता भारतात काहीही अशक्य नाही. गेल्या 10 वर्षात भारतात खूप विकास झाला आहे."