अल्लू अर्जुन हा साऊथमधील सुप्रसिद्ध अभिनेता. अल्लूने 'पुष्पा' सिनेमातून संपूर्ण जागाला त्याच्या अभिनयाने वेडं केलं. त्याआधीही 'आर्या' आणि इतर अनेक सिनेमांनी अल्लू लोकांमध्ये लोकप्रिय होता. अल्लू अर्जुन काल वेगळ्याच वादात सापडला. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या घरी जाऊन अभिनेत्याने पाठिंबा दर्शवला. त्यामुळे कायदा - सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाल्याने अल्लूवर गुन्हा दाखल केला. अखेर या प्रकरणानंतर अल्लूने मौन सोडलंय.
आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडतेय. यामध्ये अल्लू अर्जुनने आज रांगेत उभं राहून मतदान केलं. मतदान करुन बाहेर आल्यावर अल्लूने प्रसारमाध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. अल्लू म्हणाला, "मी कोणत्याही पार्टीला सपोर्ट करत नाही. तुम्ही सर्व मतदान करा, कारण हे आपलं कर्तव्य आहे. मला कल्पना आहे की, ऊन जरा जास्त आहे. पण आजचा दिवस आपलं भविष्य ठरवेल. मी कोणत्याही एका पार्टीला सपोर्ट करत नाही. जे माझ्या जवळचे आहेत त्या सर्वांना मी पाठिंबा देतो."
अल्लू पुढे म्हणाला, "रविचंद्र माझा मित्र आहे त्यामुळे मी पत्नीसह त्याला भेटलो. मी त्याला भेटायला येतोय हे आधीच सांगितलं होतं." असं अल्लू अर्जुन म्हणाला. दरम्यान काल लोकसभेच्या प्रचारात अल्लू अर्जुन उतरल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आहेत. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू आहे. परवानगीशिवाय गर्दी जमवण्यास परवानगी नाही. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन हा कायद्याचे उल्लंघन करताना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे गर्दी आटोक्यात आणण्यासाठी अल्लुला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.