Kerala Wayanad Landslide : केरळातील वायनाडमध्ये (Wayanad Landslide) दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. सोमवारी (२९ जुलै) झालेल्या या दुर्घटनेत अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. चार गावे वाहून गेली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 400 वर पोहोचला आहे. तर अपघाताला चार दिवस उलटूनही 206 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. काहीचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. या दुर्घटनेतील लोकांच्या पुनर्वसनासाठी 'बाहुबली' धावला. सुपरस्टार प्रभासने ( Prabhas) दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांच्या बचावकार्यासाठी मदत म्हणून मोठी रक्कम जाहीर केली आहे.
प्रभासने केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीला 2 कोटी रुपये दिले आहेत. प्रभासचं मोठं मन पाहून त्याचे चाहते भारावले आहेत. सध्या सोशल मीडियावर वायनाड येथील अनेक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेने सगळीकडे हाहाकार माजला आहे. भूस्खलनामुळे मोठे नुकसान झालं आहे. इस्रोने सॅटेलाईट फोटो घेऊन केरळमधील १३ फुटबॉल स्टेडियम मैदानाइतके क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. वायनाडमध्ये इंडियन आर्मीकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे.
प्रभासच्या आधी देणगी देणाऱ्या साऊथ स्टार्समध्ये मोहनलाल, राम चरण आणि त्याचे वडील चिरंजीवी, सूर्या, ज्योतिका, कार्ती, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि चियान विक्रम यांचा समावेश आहे. सूर्या, कार्ती आणि ज्योतिका यांनी मिळून ५० लाख रुपये, रश्मिका हिने १० लाख रुपये, चियान विक्रम यांनी २० लाख रुपये आणि रामचरण-चिरंजीवी यांनी १ कोटी रुपयांची देणगी दिली. तर अल्लू अर्जुनने पीडितांसाठी २५ लाखांची मदत केली आहे. तर मोहनलालने ३ कोटींची मदत केली आहे.