सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'सालार' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. यातच बहुचर्चित मेगा बजेट चित्रपट "सालार"ची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे समोर आलं आहे. तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या २१ दिवसांनंतर 'सालार' २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता. पण, 'जवान'ची क्रेझ पाहता निर्मात्यांनी प्रभासचा चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. तर चित्रपटाचे काम बाकी आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होत नाहीये, असे निर्मात्यांनी म्हटलं आहे. चित्रपट पुढे ढकलल्यामुळे निर्मात्यांना आता प्रेक्षकांचे तिकीटाचे पैसे परत करावे लागतील. 'सालार'चे अॅडव्हान्स बुकिंग आधीच सुरु केले होते.
सालारा' हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो तामिळ, कन्नड व्यतिरिक्त हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने सांभाळली आहे. याआधी प्रशांतने 'केजीएफ चॅप्टर 1' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
'बाहुबली' या सिनेमामुळे प्रभासची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. पण, 'बाहुबली'नंतर प्रभासचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. प्रभासच्या बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपटानेही चाहत्यांची निराशा केली. अशातच प्रभासला एका हिट चित्रपटाची गरज आहे. आता सालार चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धुमाकूळ घालतो, हे येणाऱ्या काळात कळेलच.