सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'सालार' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. यातच बहुचर्चित मेगा बजेट चित्रपट "सालार"ची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे समोर आलं आहे. शाहरुख खानच्या 'जवान'मुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र निर्मात्यांनी आता खरे कारण उघड केले आहे.
'सालार' हा सिनेमा या महिन्यात २८ सप्टेंबरला रिलीज होणार होता, पण तो पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत निर्मात्यांनी अधिकृत घोषणा देखील केली आहे. निर्मात्यांनी जारी केलेल्या निवदेनात म्हटले की, अनपेक्षित परिस्थितीमुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीख लांबली आहे. हा निर्णय मोठ्या जबाबदारीने घेण्यात आला आहे. प्रेक्षकांना सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल.
'सालार' हा चित्रपट तामिळ, कन्नड व्यतिरिक्त हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने सांभाळली. याआधी प्रशांतने 'केजीएफ चॅप्टर 1' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
'बाहुबली' आणि 'बाहुबली 2'च्या यशानंतर साऊथचा 'रेबल स्टार' प्रभासची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. पण, 'बाहुबली'नंतर प्रभासचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. 'साहो, राधे श्याम' आणि 'आदिपुरुष' दमदार कामगिरी करु शकले नाहीत. त्यामुळे आगामी 'सालार' या चित्रपटाकडून अभिनेत्याला मोठ्या अपेक्षा आहेत. आता सालार चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धुमाकूळ घालतो, हे येणाऱ्या काळात कळेलच.