Pushpa 2: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा'चा सीक्वल असलेल्या 'पुष्पा २'साठी प्रेक्षकांना तब्बल ३ वर्ष वाट पाहावी लागली. 'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ला देखील प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच सिनेमाचे शोज हाऊसफूल झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच अल्लू अर्जुनच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत.
केवळ देशातच नाही तर जगभरात 'पुष्पा २'चा डंका पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ने चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्डही हा सिनेमा रचत आहे. 'पुष्पा २' प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. या सहा दिवसांत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने १६४.२५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटींची कमाई केली. शनिवारी 'पुष्पा २'ने ११९.२५ कोटी कमावले. तर रविवारी १४१.५ कोटींचा गल्ला जमवला. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' सिनेमाने पहिल्या सोमवारी ६४.१ कोटींची कमाई केली आहे. तर मंगळवारी ५२.४० कोटींचा गल्ला जमवला.
'पुष्पा २'ने आत्तापर्यंत देशात ६५० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात सहा दिवसांतच सिनेमाने ९५५ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच अल्लू अर्जुनचा सिनेमा १००० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. 'पुष्पा २'ला मिळणारा प्रतिसाद पाहून चाहतेही भारावून गेले आहेत. 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'पुष्पा ३'ची घोषणादेखील करण्यात आली आहे.