अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) सिनेमाचा मोठा चाहतावर्ग आहे. २०२१ साली 'पुष्पा : द राईज' आला आणि बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमाने जगभरात यश मिळवलं. तर गेल्यावर्षी 'पुष्पा २: द रुल'ने थिएटर गाजवलं. आता सिनेमाच्या तिसऱ्या भागाची चर्चा आहे. दुसरा भाग यायला ३ वर्ष लागली. त्यामुळे तिसऱ्या भागाच्या रिलीजला किती वेळ लागणार याचा निर्माते रविशंकर यांनीच खुलासा केला आहे.
'पुष्पा:द राइज' सिनेमाने तब्बल २६७.५५ कोटी रुपये कमावले. तर जगभरात सिनेमाने ३५०.१ कोटींची कमाई केली. या भरघोस यशानंतर तीन वर्षांनी आलेल्या 'पुष्पा २: द रुल'ने थेट १२३४.१ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली. जगभरात सिनेमाचं कलेक्शन तब्बल १७४२.१ कोटींचं झालं. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत निर्माते रविशंकर म्हणाले,"सध्या अल्लू अर्जुनकडे दोन सिनेमे आहेत. एका सिनेमाचं दिग्दर्शन अॅटली करत आहे तर दुसरा सिनेमा त्रिविक्रम डायरेक्ट करत आहे. सुकुमार आणि अल्लू अर्जुन दोघांचेही हातातील सिनेमे पूर्ण होतील तेव्हाच पुष्पा ३ चं काम सुरु होईल. त्यामुळे सिनेमा २०२८ मध्ये रिलीज होऊ शकतो."
'पुष्पा ३' ची झलक दुसऱ्या भागाच्या शेवटीच दिसली होती. त्यामुळे तिसरा भाग येणार हे तेव्हाच कन्फर्म झालं होतं. सिनेमात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिकेत झळकली. तर फहाद फासिल खलनायक होता. फहादला 'पुष्पा २' मध्ये फारसा वाव मिळाला नाही म्हणून तो नाराज झाला. आता तिसऱ्या भागात खलनायक कोण असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. खलनायकाच्या भूमिकेसाठी विजय देवरकोंडाच्या नावाचीही चर्चा आहे.