अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत २२ जानेवारीला रामलला अयोध्यानगरीत विराजमान झाले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतदेखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर थलावायाने प्रतिक्रिया दिली आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर रजनीकांत अयोध्येहून कुटुंबासह चेन्नईला परतले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, "मला खूप चांगलं दर्शन मिळालं. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणाऱ्या लोकांपैकी मी एक होतो. आणि याचा मला अतोनात आनंद आहे. माझ्यासाठी हे राजकारण नसून भक्ती आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं."
याआधीही रजनीकांत यांनी रामललाचे दर्शन घेतल्यानंतर भावना व्यक्त केल्या होत्या. "हा ऐतिहासिक क्षण आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे. मी दरवर्षी अयोध्येला जाणार," असं थलावया म्हणाले होते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी थलावयांनी खास लूक केला होता. उद्घाटन सोहळ्याला रजनीकांत पांढरा कुर्ता आणि बेज शाल अशा लूकमध्ये दिसले. त्यांचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबरचा सेल्फीही व्हायरल झाला होता.